धक्‍कादायक ब्रेकिंग ! लॉकडाउननंतरही विजयपूरहून पाचजण निघाले मध्यप्रदेशला 

तात्या लांडगे
Friday, 10 April 2020

ठळक बाबी... 

  • लॉकडाउनमध्ये सीमाबंदी असतानाही पाचजण ट्रकमधून निघाले मध्यप्रदेशला 
  • विजयपूरहून (कर्नाटक) गावाकडे जाण्यासाठी बेदाणे घेऊन निघालेले तरुण सोलापुरात पकडले 
  • ट्रक चालक निघून गेला : पाचजणांची आता क्‍वारंटाईनमध्ये रवानगी 
  • तरुणांची वैद्यकीय तपासणी होणार : विकत अन्‌ फुकटात देणार होते बेदाणे 
  • जीव धोक्‍यात घालून ते पाच तरुण करणार होते मध्यप्रेदशपर्यंत प्रवास 

सोलापूर : देशातील कोरोनाचे वैश्‍विक संकट दूर करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावरुन लॉकडाउन कडक करण्यात येत आहे. मात्र, कर्नाटकातील विजयपूरमधील मुबवाड येथून ट्रकमध्ये बसून पाच तरुण मध्यप्रदेशातील शिवपुरीला निघाले होते. त्यांना सोलापुरातील पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलिसांना मिळणार 75 टक्‍केच वेतन 

मध्यप्रदेशातील शिवपुरीतून उदरनिर्वाहासाठी पाच तरुण कर्नाटकातील विजयपूरला आले. मुलवाड येथे त्यांनी काम सुरु केले मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना घराकडे जाण्याचा रस्ताच बंद झाला. त्यांच्या मालकाने त्या तरुणांना ट्रकमधून मध्यप्रेदशात जाण्याची व्यवस्था केली आणि एका ट्रकमध्ये बसवून पाठविले. विजयपूरहून लपतलपत ते ट्रकमधून सोलापुरात आले. मात्र, सोलापुरातील सीमेवरील नाकाबंदीत पोलिसांना ते पाच तरुण दिसले. त्यांच्याकडे बेदाण्याने भरलेल्या पिशव्या होत्या. बेदाणा विक्री करायची अथवा फुकट देऊन गाव गाठायचे, असा निश्‍चित पाचजणांनी केला. मात्र, त्यांना सोलापूर पोलिसांनी पकडून त्यांची रवानगी भारती विद्यापीठातील आयसोलेशन वॉर्डमध्ये केली. 

हेही नक्‍की वाचा : लॉकडाउन असतानाही त्या 11 जणांनी गाठले गाव 

आम्हाला गावाकडे जायचे आहे 
दोन महिन्यांपूर्वी मध्यप्रेदशातील शिवपुरीतून आम्ही विजयपूरजवळील मुलवाड येथे कामासाठी आलो आहोत. कोरोनामुळे कुटुंबियांना आमची काळजी वाटत असून त्यांनी आम्हाला गावाकडे बोलावले आहे. मात्र, खूप दिवसांपासून वाहन नसल्याने जाता आले नाही. मालकाने आम्हाला ट्रकमध्ये बसविले आणि आम्ही गावाकडे निघालो होतो, परंतु सोलापुरात पोलिसांनी आम्हाला पकडले. आम्हाला गावाकडे जायचे असून आम्हाला सोडा, अशी विनंती त्या पाच तरुणांनी पोलिसांकडे केली. मात्र, कोरोनाची भिती लक्षात घेऊन पोलिस त्यांना आयसोलेशन वॉर्डकडे घेऊन गेले. 

हेही नक्‍की वाचा : भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात ! इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकलचा रिसर्च 

चारजणांकडे रुमाल तर एकाकडे काहीच नव्हते 
विजयपूरहून मध्यप्रेदशातील शिवपुरी जिल्ह्यात निघालेल्या पाचही तरुणांचे वय 35 वर्षांपर्यंत आहे. त्यातील चार तरुणांकडे हातरुमाल होता, मात्र प्रवासात त्यांनी तो नाकाला बांधलेला नव्हता. पोलिसांनी दम दिल्यानंतर त्यांनी नाकाला रुमाल बांधला तर एकाकडे रुमालही नव्हता ना मास्कही नव्हते. जीव धोक्‍यात घालून निघालेले पाच तरुण विजयपूरहून सोलापुरात कसे आले, याची चौकशी आता पोलिसांनी सुरु केली आहे. त्या तरुणांची संपूर्ण माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड यांनी घेतली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five youths arrive in Madhya Pradesh from Vijayapur