शहराचे माजी महापौर म्हणतात, कोरोनामुळे नव्हे तर उपासमारीने मरण येणे सर्वांत वाईट! 

Chowpatty
Chowpatty

सोलापूर : सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात खाद्यपदार्थांची विक्री करणारे शहरातील भेळपुरी, पाणीपुरी व वडापाव विक्रेत्यांची रोजीरोटी गेल्या साडेतीन महिन्यांपासून कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे बंद आहे. त्यांची उपासमार सुरू आहे. कोरोनामुळे माणूस बरा होऊ शकतो, मात्र उपासमारीने मरण येणे सर्वांत वाईट असते. त्यामुळे या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना निदान पार्सल सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पार्क चौपाटी खाद्यपदार्थ विक्रेते कल्याणकारी संघटनेचे संस्थापक तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केली आहे. 

शहरातील पार्क चौपाटी व इतर ठिकाणी भेळपुरी, पाणीपुरी, आईस्क्रीम, वडापाव, चायनीज, व्हेज-नॉनव्हेज, पावभाजी आदी गाड्यांच्या मालकांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगार व इतरांची रोजीरोटी साडेतीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कमी किमतीत सर्वसामान्यांचे पोट भरणाऱ्या या दुकानदारांचीच आता उपासमार सुरू आहे. हॉटेल व रेस्टॉरंटला पार्सल सेवेची सुविधा मिळाली होती, आता बुधवारपासून हॉटेल व रेस्टॉरंट आदी सुरू करण्यासही परवानगी मिळाली आहे. मग हातावर पोट असलेल्या पार्क चौपाटी व शहरातील इतर चौपाटीतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना निदान पार्सल सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे निवेदन श्री. सपाटे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना दिले होते. मात्र त्यावर अद्याप काहीच निर्णय झाला नाही. 

पार्क चौपाटी येथे खाद्यपदार्थांच्या 48 गाड्या आहेत. प्रत्येक गाडीवर चार ते पाच कामगारांच्या कुटुंबीयांची रोजीरोटी अवलंबून आहे. लॉकडाउनमुळे 17 मार्चपासून सर्व गाडे बंद आहेत. तरी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यापर्यंत मालकांनी कामगारांना ऍडव्हान्स रक्कम व धान्याची व्यवस्था केली होती. मात्र व्यवसायाला परवानगी मिळत नसल्याने आता मालकांचीही उपासमार सुरू झाली आहे. मालक व कामगारांची तसेच स्वस्तात खाद्यपदार्थ मिळत नसल्याने सर्वसामान्यांचीही आता उपासमार सुरू झाली आहे. 

श्री. सपाटे म्हणतात, साडेतीन महिन्यांपासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांची उपासमार सुरू आहे. त्यांना पार्सल सेवेला परवानगी दिल्यास रस्त्यावर भिकारी व गरिबांचे पोट भरणार आहेत. आता लॉकडाउन पुन्हा होण्याची चर्चा सुरू आहे. पुन्हा लॉकडाउन लागल्यास या विक्रेते व कामगारांच्या जिवावर येईल. सायंकाळी चार ते आठपर्यंत या विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी. 

पार्क चौपाटी येथील खाद्यपदार्थ विक्रेते गौरव गुप्ता म्हणाले, शहरातील हॉटेल व रेस्टॉरंटमधून पार्सलमार्फत खाद्यपदार्थ विक्रीची सुविधा प्रशासनाने दिली होती. मात्र हॉटेलातील खाद्यपदार्थांचे ग्राहक हे श्रीमंत वर्गातील आहेत. जे बेघर, गरीब आहेत त्यांना आमच्या गाडीवरील खाद्यपदार्थ परवडतात. त्यांच्यासह लॉकडाउनमुळे आमच्यावर व 250 कामगारांच्या कुटुंबीयांवरही उपासमारीची वेळ आली आहे. इतके दिवस कामगारांना सांभाळलो आता यापुढे ते शक्‍य नाही. हॉटेल सुरू होणार तर आमच्या व्यवसायालाही परवानगी द्या. आम्ही प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com