'मंगळवेढेकर'च्या आजी-माजी संचालकांमध्ये कलगीतुरा ! वैद्य अन्‌ डॉ. येळेगावकर आमनेसामने 

45447361 - Copy.jpg
45447361 - Copy.jpg

सोलापूर : मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने 2016-17 आणि 2017-18 या दोन वर्षात 91 विद्यार्थ्यांना 'एमबीए' या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्याने आणि संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता अपूर्ण असतानाही प्रवेश दिल्याने विद्यापीठाने त्यांचा निकाल राखून ठेवला. त्यासाठी संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. श्रीकांत येळेगावकर जबाबदार असल्याचे पत्र प्रभारी संचालक प्रमोद वैद्य यांनी काढले. तर प्रमोद वैद्य यांची पत्नी प्रा. सविता वैद्य याच त्या विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांचा मनमानी कारभार होता, असे उत्तर डॉ. येळेगावकर यांनी दिले आहे. या दोघांमधील कलगीतुऱ्याने मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटसारख्या संस्थेच्या प्रतिमेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

शहरात नावलौकिक असलेल्या मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमध्ये 2016-17 या शैक्षणिक वर्षात 43 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी प्रथम तथा द्वितीय सत्राची परीक्षाही दिली. तसेच 2017-18 मध्ये संस्थेने 48 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जावर प्राचार्यांचीच स्वाक्षरी असते. तत्कालीन संचालक डॉ. येळेगावकर यांनी त्याचवेळी या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न सोडवायला हवा होता. परंतु, त्यांनी या विषयात लक्ष घातलेच नाही, असे प्रभारी संचालक श्री. वैद्य यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे. दुसरीकडे प्रवेश प्रक्रिया सुरु असताना 'एमबीए' विभागप्रमुख प्रा. सविता वैद्य यांनी संबंधित विद्यार्थ्यांकडील कागदपत्रांची पडताळणी न करताच तत्काळ प्रवेश दिला. त्यावेळी चार प्रवेश कमी झाले तरी चालेल, परंतु कागदपत्रे पूर्ण असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावा, असे बजावूनही सौ. वैद्य यांनी त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे डॉ. येळेगावकर म्हणाले.

वैद्यांची पत्नीच 'एमबीए'च्या विभागप्रमुख 
'एमबीए' अभ्यासक्रमाच्या कोणत्याही कागदपत्रावर माझी स्वाक्षरी नाही. त्या विभागाच्या प्रमुख म्हणून प्रा. सविता वैद्य काम पाहत होत्या. प्रभारी संचालक प्रमोद वैद्य आणि त्यांच्या पत्नीच्या कामकाजाबद्दल त्यावेळी मी वारंवार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविणे, एनएसएस सुरु करणे अशी कामे माझ्या कार्यकाळात झाली. प्रवेश नियामक मंडळाने प्रलंबित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रमोद वैद्य यांनी मागील दीड वर्षात या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न का सोडविला नाही. 
- डॉ. श्रीकांत येळेगावकर, तत्कालीन संचालक, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट

13 विद्यार्थ्यांची कागदपत्रे द्यावीत अन्यथा... 
मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर संस्थेने 2016-17 मधील आठ विद्यार्थ्यांचे तर 2017-18 मध्ये पाच विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. प्रवेश नियामक मंडळाच्या यादीनुसार सर्वच विद्यार्थ्यांची पात्रता ग्राह्य धरुन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला तसे आदेश दिले आहेत. संस्थेने याचे उत्तर तत्काळ द्यावे, अन्यथा संस्थेसमोर निर्दशने केली जातील. 
- लहू गायकवाड, विद्यार्थी संघटना प्रमुख, सोलापूर 


तत्कालीन संचालक डॉ. येळेगावकरांनी लक्षच दिले नाही 
संस्थेत एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या 2016-17 आणि 2017-18 या वर्षातील विद्यार्थ्यांचा प्रश्‍न तत्कालीन संचालक येळेगावकर यांनी सोडविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे दोन-तीन वर्षांपासूनचा विद्यार्थ्यांचा मार्गी लागला आहे. 
- प्रमोद वैद्य, प्रभारी संचालक, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com