बा विठ्ठला... नाटकी लोकांना शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची सुबुद्धी दे : सदाभाऊ खोत

former minister Sadabhau Khot said during the Thackeray government, people do not get justice.jpg
former minister Sadabhau Khot said during the Thackeray government, people do not get justice.jpg

पंढरपूर (सोलापूर) : कृषी कायद्यासंदर्भात मोदी सरकारने अनेकवेळा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलकांसोबत ऐतिहासिक चर्चादेखील केली आहे. तरीही काही लोक मोदींना व कृषी कायद्याला विरोध करत आहेत. अशा नाटकी लोकांना शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची सुबुध्दी द्यावी, यासाठी विठुरायाला साकडं घातले. राज्यात महाविकास आघाडी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज तोडून या सरकारने शेतकऱ्यांच्या मूळावर घाव घातला आहे. उद्धव ठाकरे यांचे हे सरकार म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखे आहे. ठाकरे सरकारच्या काळात लोकांना न्याय मिळत नाही, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. 

शनिवारी सकाळी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी कृषी कायद्याच्या समर्थनार्थ शिवाजी चौकातून विठ्ठल मंदिरापर्यंत भजन रॅली काढली. हातात भाजपचे झेंडे घेवून शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी फायद्याच्या समर्थनार्थ घोषणा देत विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर नामदेव पायरीजवळ बसून कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भजनही केले. 

केंद्रीय कृषी कायद्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलेले असतानाच माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, प्रशांत परिचारक यांनी कृषी कायद्याचे समर्थन करत कृषी कायद्याला विरोध करणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. 

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले, भाजप अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे, भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष घोडके, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, माऊली हळणवर, गणेश बागल, छगन पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचाच फायदा 

केंद्राच्या या नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. यामुळेच विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. ज्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये करार शेती फायद्याची म्हटले आहे. त्याच शेतकरी नेत्यांनी आता करार शेतीला विरोध केला आहे. त्यांच्या या आत्मचरित्रामध्ये शंका असल्याची टीका ही खोत यांनी केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com