सोलापूरकरांसाठी सोनेरी दिवस ! पोस्ट तिकिटाच्या माध्यमातून भारत सरकारतर्फे "चार हुतात्म्यां'चा गौरव 

अक्षय गुंड 
Thursday, 7 January 2021

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सोलापुरातील चार हुतात्म्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या केंद्रीय संचार मंत्रालयाच्या वतीने तसेच सोलापूरचे सुपुत्र आयआरएस वैभवकुमार आलदर यांच्या विशेष प्रयत्नाने "हुतात्मा दिनाचे' औचित्य साधून 12 जानेवारी रोजी सोलापूरचे हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण व लोकार्पण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सोलापुरातील चार हुतात्म्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या केंद्रीय संचार मंत्रालयाच्या वतीने तसेच सोलापूरचे सुपुत्र आयआरएस वैभवकुमार आलदर यांच्या विशेष प्रयत्नाने "हुतात्मा दिनाचे' औचित्य साधून 12 जानेवारी रोजी सोलापूरचे हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण व लोकार्पण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. ही बाब सोलापूरकरांसाठी गौरवास्पद असून, सोलापूरच्या इतिहासात हा सोनेरी दिवस म्हणून नोंदविला जाणार आहे. 

12 जानेवारी 1931 रोजी सोलापूरचे चार हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना तत्कालीन ब्रिटिश सरकारने क्रूर अशा मार्शल "लॉ'च्या आधारे फाशीची शिक्षा दिली होती. कारण, इतिहासात अशी एकमेव घटना आहे, की सोलापूरने भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते, म्हणजे 9 ते 11 मे 1930. त्यात या स्वातंत्र्यवीरांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे आज 90 वर्षांनंतर सर्व सोलापूरकरांना ज्याचा सार्थ अभिमान वाटावा अशी घटना पूर्ण होत आहे. भारत सरकारच्या केंद्रीय संचार मंत्रालयाच्या वतीने तसेच सोलापूरचे सुपुत्र आयआरएस वैभवकुमार आलदर यांच्या विशेष प्रयत्नाने सोलापूरच्या या हुतात्मा, निरपराध, स्वातंत्र्य सैनिकांवर पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या सर्व गोष्टींसाठी मागील काही वर्षांपासून सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख तसेच परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था, सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने प्रयत्न सुरू होते. 

आमदार सुभाष देशमुख हे सहकारमंत्री असताना, संचार मंत्रालयात याबाबत अर्ज केला होता. तसेच खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचेही प्रयत्न चालू होते. तर सोलापुरातील परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेने देखील संचार मंत्रालयात पुन:श्‍च पोस्टाच्या तिकिटाच्या प्रसिद्धीसाठी अर्ज केला आणि पुढील लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरवात केली होती. यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचे परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेला मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेने पोस्टाचे तिकीट पब्लिश व्हावे याकरिता लागणारे सर्व सरकारी पुरावे, चारही हुतात्म्यांची योग्य ती माहिती, संचार मंत्रालयाच्या अटी/शर्तीसह संचार मंत्रालयाकडे पुरविली होती. या कामी सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मोलाचे सहकार्य केले. नगर सचिव दंतकाळे, शिवशंकर धनशेट्टी, डॉ. सतीश वळसंगकर, दत्तात्रय जक्कल, लेखक इतिहासकार डॉ. श्रीकांत येळेगावकर व त्यांचे कर्मचारी यांनीही पुरावे काढून देण्यात सहकार्य केले. फोटोग्राफर अनिल भूदत्त आणि मदतनीस हर्षवर्धन देवरेड्डी यांनी फोटो एडिटिंगमध्ये मदत केली होती. अशा पद्धतीने सोलापूरकरांसाठी गौरव असणाऱ्या चार हुतात्म्यांच्या तिकिटासाठी लागणारे सर्व पुरावे व माहितीची पूर्तता करण्यात आली होती. 

केंद्रीय संचारमंत्री रवी शंकर प्रसाद व केंद्रीय संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अटी व शर्ती पूर्ण केलेल्या अर्जास मान्यता दिली. तसेच केंद्रीय संचार राज्यमंत्री धोत्रे यांनी तिकीट वितरित करण्यासाठी लागणारे पाच लाख रुपयांचे मूल्य सोलापूरच्या अस्मितेचा विचार करून आणि 90 वर्षांनंतर स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली म्हणून माफ केले. अशाप्रकारे सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले व 5 जानेवारी 2021 रोजी संचार मंत्रालयाने सोलापूरचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरणाऱ्या या चार हुतात्म्यांवरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण होत आहे, हे जाहीर केले. या पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा 12 जानेवारी 2021 रोजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये होत आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोलापुरातील या चार हुतात्म्यांनी प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे या सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न केले आणि केंद्रीय संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी त्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले, त्यामुळे हे यश मिळाले. यासाठी जिल्ह्यातील बरेच जणांचे सहकार्य लाभले. 
- वैभवकुमार आलदर, 
अतिरिक्त खासगी सचिव (केंद्रीय संचार मंत्रालय राज्यमंत्री) 

सोलापुरातील चार हुतात्म्यांचे कार्य देशपातळीवर व्हावे या दृष्टीने पोस्टल तिकिटासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रांची पूर्तता संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केली. अनेकांच्या सहकार्यामुळे आज केलेल्या या प्रयत्नांना यश आले आहे, त्यामुळे आनंद वाटत आहे. 
- अमृता अकलूजकर, 
सचिवा, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four martyrs honored by Government of India through postage stamps