राष्ट्रवादी युवकच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी गणेश पाटील 

प्रमोद बोडके
Friday, 23 October 2020

सकाळचा अंदाज ठरला खरा 
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी गणेश पाटील यांच्या नियुक्तीची शक्‍यता असा सकाळच्यावतीने व्यक्त करण्यात आला होता. सकाळने व्यक्त केलेला हा अंदाज आज गणेश पाटील यांच्या नियुक्तीने तंतोतंत खरा ठरला आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी भोसे येथील गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज मुंबईत गणेश पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. युवक जिल्हाध्यक्ष या पदासाठी यापूर्वीच अर्ज केलेल्या सात जणांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यामध्ये गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणूक पाहता व आपण ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने आपल्याला युवक जिल्हाध्यक्ष पदाची एक वर्षाची मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव मावळते अध्यक्ष विक्रांत माने यांनी प्रदेशाध्यक्ष शेख यांच्याकडे ठेवला होता. 

हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून अध्यक्षपदी गणेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष कै. राजूबापू पाटील यांचे अकाली निधन झाले. राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षपदी नव्याने नियुक्त झालेल्या अध्यक्ष गणेश पाटील हे कै. राजूबापू पाटील यांचे चिरंजीव आहेत. भोसेच्या उपसरपंचपदी कार्यरत आहेत. गणेश पाटील यांच्या या निवडीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसने पवार व पाटील परिवाराच्या ऋणानुबंधाला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Patil as Solapur District President of NCP Youth