पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचालकांना लुटणारी टोळी जेरबंद 

संतोष पाटील 
Sunday, 30 August 2020

पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्र म्हणाले, पुणे सोलापूर महामार्गावर सतत मालट्रक चालकांना लुटणाऱ्या तरुणांच्या अनेक टोळ्या कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलीस या टोळ्यांच्या मागावर होते. यासाठी पोलिसांची गस्त महामार्गावर सुरू होती. मात्र गुन्हेगार सतत तीन दिवस हुलकावणी देत होते. शनिवारी रात्री गुन्हा घडताच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. 

टेंभुर्णी (सोलापूर) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मालट्रक चालकांना अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करून 43 हजार रूपयांचा ऐवज लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी सापळा रचून पकडले असून त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या दोन कारही पोलिसांनी जप्त केल्या असल्याची माहिती करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
याप्रकरणी रोहन देविदास ढवळे (वय 24), रणजित बलभीम ढवळे (वय 23), महादेव विठ्ठल ढवळे (वय 24, तिघेही रा. अकोले बुद्रुक, ता. माढा), सोहम विठ्ठल मस्के (वय 20, रा. शेवरे, ता. माढा) व सूरज तुकाराम महाडिक (वय 19, रा. माळेगाव, ता. माढा) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून या गुन्ह्यासाठी वापरलेल्या एमएच 04/ईएफ 3693 व एमएच 04/डीएफ 7517 या दोन कार जप्त केल्या आहेत. 
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून लुटमारीचे छोटे-मोठे गुन्हे घडत होते. मात्र किरकोळ घटना असल्याने किंवा पोलिसांची नको ती कटकट म्हणून मालट्रक चालक गन्हे दाखल करीत नव्हते. याचा गैरफायदा घेऊन अनेक जण महामार्गावर ट्रकचालकांना अडवून लूटत होते. यासाठी ते कारचा वापर करीत होते. हे प्रकार वाढू लागल्याने पोलिसांनी महामार्गावर गस्त वाढविली होती. दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजण्याच्या सुमारास वरवडे टोल नाक्‍याच्या पश्‍चिमेस दोन किलोमीटर अंतरावर मालट्रक चालक अनिस वशारद उल्ला (वय 30, रा. फेनहा, ता. पट्टी, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश) हा त्याच्या कडील मालट्रकमध्ये (युपी 70/जीटी 7353) झाडे घेऊन हैद्राबाद येथे आला होता. तेथून तो सांगोला येथे रिकामा आला व तेथून शनिवारी रात्री डाळिंब घेऊन उर्वरित डाळिंब माल घेण्यासाठी तो महामार्गावरील माढा तालुक्‍यातील भोईंजे येथील परफेक्‍ट मार्केट यार्डकडे निघाला होता. 
वरवडे येथील टोल नाक्‍यावरून वळून येत असताना अंधारामुळे चालक रस्ता चुकल्याने त्याने ट्रक बाजुलाला घेऊन मॅनेजरला मोबाईलवरून रस्ता विचारत होता. त्याने समोर थांबलेल्या कार (एमएच 04/डीएफ 7517)मधील लोकांना ही रस्ता विचारल्यावर त्यांनी तो बरोबर असल्याचे सांगितले. तो निघणार एवढ्यात त्याच कारमधून चारजण उतरले व चालकाचा बाजूने दोघे व वाहकाच्या बाजूने दोघे ट्रकच्या केबीनमध्ये जबरदस्तीने चढले. तर एकजण कारजवळ थांबला. त्यांनी चालक व वाहक यांना मारहाण करून जखमी केले. तसेच चालकाच्या गळ्यास चाकू लावून त्याच्या खिशातून 38 हजार रोख, पाच हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 43 हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते कारमध्ये बसून निघून गेले. या घटनेनंतर ट्रकचालक अनिस उल्ला याने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने या कारचा व आरोपींचा शोध घेऊन जेरबंद केले. 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस फौजदार अशोक बाबर, पोलिस हवालदार राजेंद्र डांगे, पोलिस नाईक दत्ता वजाळे, राजेंद्र ठोंबरे, धनाजी शेळके यांनी ही कारवाई केली. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang jailed for robbing truck drivers on Pune Solapur highway