यू ट्युब चॅनेलच्या माध्यमातून सुरु ठेवली शिक्षणाची गंगा

संतोष सिरसट 
Saturday, 5 September 2020

विद्यार्थ्यांसाठी जे उपयोगी ते देण्याचा प्रयत्न
कोरोना काळात बऱ्याच शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे त्यांना व्हिडिओ छान असल्याबाबतचे फोनही आले. त्याचा त्यांना खूप उपयोग झाला. त्या फोनमुळे त्यांना खूप प्रेरणा मिळाली. त्यांच्या या तंत्रस्नेही उपक्रमात त्यांना गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्‍वर निंबर्गी, केंद्रप्रमुख तिपण्णा कमळे, मुख्याध्यापक चंद्रकांत भोई यांचे सहकार्य लाभले. त्यांनी शिक्षणक्षेत्राला वाहून घेतले आहे. जे-जे विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असेल ते-ते यु-ट्युब चॅनेलच्या माध्यमातून देत राहण्याचा संकल्पही श्री. पाटोळे यांनी केला आहे.

सोलापूर ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळे (ता. मोहोळ) येथील तंत्रस्नेही शिक्षक विनोद पाटोळे यांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या स्वतःच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम केले. त्यांनी केलेल्या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहे. केवळ त्यांच्याच शाळेतील नव्हे तर राज्यभरातील इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा झाला आहे.

"शाळा बंद पण शिक्षण सुरू' या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पाटोळे यांनी जूनपासून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली. त्यांच्याकडे दुसरीचा वर्ग आहे. त्यांनी मुलांचे वहॉट्‌सऍप नंबर घेऊन गुॅप तयार केला. त्या ग्रुपवर मुलांना दररोज अभ्यास देऊ लागले. त्यांनी केलेला अभ्यास मुले पाठवायचे आणि गुरुजी तो चेक करून त्यांना पाठवायचे. हे सत्र सुरू झाले. पालकांची बैठक घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. काही मुलांकडे स्मार्ट फोन नाही, त्यांना शेजारी असलेल्या मुलांची मदत घेण्यास सांगितले. मुले यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात राहू लागली.

"टेक्‍नो क्रिएटिव्ह टिचर' हा त्यांचा स्वता:चा यु ट्युब चॅनल आहे. त्यांनी ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात 2017 पासूनच केली आहे. त्यांच्या चॅनलवर पहिली ते सातवीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांच्या कविता चाली, कृतिसह ते पाठवितात. याचा उपयोग जिल्ह्यातील शिक्षक आणि विद्यार्थी याना होतोच. परंतु, जिल्ह्याबाहेर राज्यभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांना देखील याचा उपयोग झाला आहे. काही व्हिडिओ भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये देखील पाहिले गेले आहेत. तर काही व्हिडिओ बाहेरील देशात देखील पाहिले जातात. आजपर्यंत जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त व्ह्युज त्यांना मिळाल्या आहेत. आजवर जवळपास 258 व्हिडिओ यु ट्युबवर शेअर केले आहेत. ज्याचा उपयोग बरेच शिक्षक व विद्यार्थ्यांना होत आहे. या वर्षी दुसरीचे मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांचे पेज टू पेज व्हिडिओ तयार करत आहेत. मुलांना समजेल अशा भाषेत त्यांचे व्हिडिओ आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganga of education continued through YouTube channel