असुविधांमुळे सोलापुरातील गारमेंट उद्योजकांचे पुण्यात "कॉमन मार्केट'!

श्रीनिवास दुध्याल
गुरुवार, 19 मार्च 2020

सोलापुरात रेल्वेची सेवा आहे, मात्र तीही मर्यादित. उद्योगवाढीच्या दृष्टीने आवश्‍यक विमानसेवेचे राजकारण अजूनही सुरूच आहे. मेट्रो सिटींमध्ये आंतरराष्ट्रीय खरेदीदार, व्यापारी व व्यावसायिक भेट देत असतात. त्यामुळे गणवेशाचे उत्पादन सोलापुरात होत असले तरी विमानसेवा व इतर सुविधा नसल्याने व्यावसायिक वेळ व पैसा घालवून सोलापूरला येण्यास धजावत नाहीत. त्यासाठी कॉमन मार्केटसाठी पुणे शहराची निवड करण्यात आली आहे.

सोलापूर : येथील गारमेंट उत्पादनांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झेप घेण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यासाठी सलग चार वर्षे आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन आयोजित केले होते. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. मात्र, सोलापुरातून जगभर मार्केटिंग करण्यासाठी अनेक अडचणी व असुविधा असल्याने "कॉमन मार्केटिंग'साठी येथील श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने पुणे शहराची निवड केली आहे.

हेही वाचा - जागे व्हा : तापमानवाढीचा अन्‌ कोरोनाचा नाही संबंध

वर्षभर मार्केटिंगसाठी घेतला निर्णय
ंयेथील गारमेंट उत्पादनातील कॉर्पोरेट व शालेय गणवेश देशभर पोचत आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन घेतले जात आहेत. मात्र, वर्षातून तीन दिवस आयोजित प्रदर्शनात अपेक्षित मार्केटिंग साध्य होत नसल्याचे दिसून आले आहे. मेट्रो सिटी असलेल्या चेन्नई, हैदराबाद, मुंबई, पुणे, बंगळूर आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय खरेदीदार, व्यापारी व व्यावसायिक भेट देत असतात. त्यामुळे गणवेशाचे उत्पादन सोलापुरात होत असले तरी विमानसेवा नसल्याने व देश-विदेशातील ग्राहक, व्यावसायिक वेळ व पैसा घालवून सोलापूरला येण्यास धजावत नाहीत. मग वर्षभर मार्केटिंगचा विषय पुढे आला. त्यासाठी "कॉमन मार्केट सेंटर' या पर्यायावर असोसिएशनने शिक्कामोर्तब केले.

मार्केटिंगच्या दृष्टीने सोलापुरात असुविधा
सोलापुरात रेल्वेची सेवा आहे, मात्र तीही मर्यादित. उद्योगवाढीच्या दृष्टीने आवश्‍यक विमानसेवेचे राजकारण अजूनही सुरूच आहे. खरेदीदार, व्यापाऱ्यांना एक दिवसात भेट देऊन जायचे असते. लांबचा व अनेक तासांचा ठरणाऱ्या रेल्वे व रस्तामार्गाने प्रवास खरेदीदारांना परवडत नाही. मोठी ऑर्डर देणारी पार्टी सोलापूरला येत नाही, त्यांनाच भेटण्यासाठी उत्पादकाला जावे लागते. तोही खर्च उत्पादकाला परवडणारे नाही.

"कॉमन मार्केटिंग'साठी पुणे शहराची वैशिष्ट्ये
कॉमन मार्केटिंगसाठी असोसिएशनने हैदराबाद, मुंबई व पुणे शहराचा सर्व्हे केला. मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवा, कॅब, रिक्षा व दळणवळणाच्या सुविधा असलेल्या, सोलापूर शहराला जवळ व गारमेंट उद्योगात नावाजलेल्या पुणे शहराची निवड केली. देशी-विदेशी व्यापाऱ्यांना पुणे येथे एका दिवसात येणे-जाणे सोयीचे ठरणार. त्यासाठी 60 ते 70 उत्पादक पुण्यातील मोक्‍याच्या ठिकाणी कॉमन मार्केट सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत.

ब्रॅंडेड कंपन्यांशी जोडणे, गारमेंट हबसाठी प्रयत्न
सोलापुरात विमानसेवा कधी सुरू होणार, झाली तरी कधी व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवा मिळणार का, या शक्‍य-अशक्‍यांच्या बाबींवर विसंबून न राहता उद्योगवाढ महत्त्वाची आहे. सध्याचे मार्केट वेगवान आहे. ब्रॅंडेड कंपन्यांशी जोडण्यासाठी मेट्रो सिटीत वर्षभर एक्‍झिबिशन, मार्केटिंग होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी असोसिएशनने कॉमन मार्केटिंगचा विचार करून त्यासाठी पुणे शहराची निवड केली आहे. "कोरोना' आटोक्‍यात आल्यावर त्या दिशेने कार्यवाही सुरू होईल.
- शैलेंद्र घनाते, संचालक, असोसिएटेड गारमेंट क्‍लस्टर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garment entrepreneurs to launch common market in Pune for Solapur Uniform Hub