
सोलापूर : शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर महापालिकेची सोमवारी (ता. 20) सर्वसाधारण सभा पार पडली. कोरोनामुळे प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सभा घेण्यात आली. मात्र, नगरसचिव कार्यालयाकडून नगरसेवकांना निरोपच देण्यात आला नाही. त्यामुळे सभेत अवघ्या 25 ते 30 नगरसेवकांनाच सहभाग घेता आला. दरम्यान, कोरोनासह अन्य आजारांनी मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पित करून दुखवटा प्रस्तावाद्वारे ही सभा काही वेळातच तहकूब करण्यात आली.
महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. या वेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृहनेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसचिव रऊफ बागवान यांची सभागृहात उपस्थिती होती. तर शहरातील विविध प्रभागांमधील नगरसेवकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदविला. सभा सुरू होताच दुखवट्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चंद्रकांता वेदप्रकाश गोयल, महापालिकेचे माजी महापौर तथा माजी आमदार युन्नूस शेख, नगरसेविका वत्सला बरगडे, माजी उपमहापौर लालसिंग रजपूत, माजी नगरसेविका गीता जाधव, माजी नगरसेवक सुनील खटके यांच्या मातु:श्री सुभद्रा पांडुरंग खटके, माजी नगरसेवक चंद्रकांत वडनाल, माजी नगरसेविका खैरुन्निसा शेख (सोडवाले), विजया वड्डेपल्ली यांच्या मातु:श्री राजम्माबाई शेरला, राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, "सकाळ'चे ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार सोनवणे यांच्यासह महापालिकेच्या अन्य मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.
"व्हॉट्सऍप ग्रुप' काढून रात्री केला मेसेज
सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून कोरोनासह अन्य आजारांनी मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पित करता यावी, या हेतूने आम्हाला नगरसचिव कार्यालयाकडून निरोप यायला हवा होता. मात्र, अधिकाऱ्यांनी बहुतांश नगरसेवकांना कोणतीही कल्पना न देता व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून रात्री उशिरा मेसेज पाठविला. त्याची काहीच कल्पना नसल्याने या सर्वसाधारण सभेला केवळ 25 ते 30 नगरसेवकांचीच उपस्थिती पाहायला मिळाली. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे प्रयोग होणार असल्याने नगरसचिव कार्यालयाकडून वेळेत निरोप पोचल्यास महापालिकेच्या कामकाजात सर्वांना सहभागी होता येईल, असा विश्वास नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी व्यक्त केला.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.