
पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे यासाठी डिसले गुरुजींनी एक युक्ती केली. रोज रात्री सात वाजता संपूर्ण गावाला ऐकू जाईल असा अलार्म वाजविला जातो. अलार्म वाजताच घराघरांत चालू असणारे सर्व टीव्ही लगेच बंद करून सर्व पालक आपापल्या पाल्यांना घेऊन अभ्यासाला बसतात. याचेही अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले.
करकंब (सोलापूर) : रणजितसिंह डिसले गुरुजींनी शिक्षण प्रक्रियेमध्ये समाजाला सामावून घेताना एक अनोखा उपक्रम राबविला. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करताना तो विद्यार्थ्यांना कधीही रटाळ वाटता कामा नये, याची त्यांच्याकडून विशेष दक्षता घेतली जात होती. पण त्याचवेळी पालकांनीही घरी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, या हेतूने त्यांनी घरचा अभ्यास पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यास सुरवात केली. त्यामुळे शाळा सुटायच्या आधी पालकांना मुलांनी घरी करावयाच्या अभ्यासाविषयी कल्पना मिळू लागली. एवढेच नाही तर दररोज किमान एक तास तरी पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासासाठी दिला पाहिजे, असे रणजितसिंह डिसले यांना वाटायचे.
अलार्म ऑन - टीव्ही ऑफ !
पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे यासाठी डिसले गुरुजींनी एक युक्ती केली, ती म्हणजे "अलार्म ऑन - टीव्ही ऑफ'! रोज रात्री सात वाजता संपूर्ण गावाला ऐकू जाईल असा अलार्म वाजवला जातो. अलार्म वाजताच घराघरांत चालू असणारे सर्व टीव्ही लगेच बंद करून सर्व पालक आपापल्या पाल्यांना घेऊन अभ्यासाला बसतात. याचेही अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले. पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य असणारे डिसले गुरुजी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते. यातूनच त्यांना क्यूआर कोडची संकल्पना सुचली.
डिसले गुरुजींची "क्यूआर' कोड पद्धत पाठ्यपुस्तकात
केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञानाने विद्यार्थी कधीच समृद्ध बनू शकत नाही तर त्याला अधिकचे शिक्षण दिले पाहिजे, अशी धारणा डिसले गुरुजींची होती. विद्यार्थ्यांना अधिकाधिक समृद्ध करण्याच्या विचारातून त्यांनी क्यूआर कोड पद्धत शोधून काढली. क्रमिक पुस्तकातील पाठावर आधारित त्यांनी ही क्यूआर कोड पद्धत तयार केली आहे. याचा प्रथम प्रयोग त्यांनी त्यांच्याच शाळेतील नऊ विद्यार्थ्यांच्या अध्यापनात केला. त्यांचे रिझल्ट मिळाल्यानंतर ही पद्धत माढा तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात आली.
नंतर सन 2015 साली महाराष्ट्र शासनाने या पद्धतीच्या सहावीच्या क्रमिक पुस्तकामध्ये केला. याचे अतिशय चांगले सकारात्मक परिणाम दिसून आले. सध्या शासनाने संपूर्ण अभ्यासक्रमात या क्यूआर कोडचा वापर केलेला आहे. पण त्याही पुढे जाऊन आता पुढील वर्षीपासून हीच क्यूआर कोड पद्धत भारतातील सर्व शाळांमधील पाठ्यपुस्तकात वापरली जाणार आहे. एवढेच नाही तर सध्या संपूर्ण जगभरातील तब्बल अकरा देशांतील शाळांमध्ये या क्यूआर कोडचा वापर केला जात आहे. त्यामानाने आपल्या भारत सरकारने मात्र ही पद्धत अवलंबिण्यास जरा उशीरच केला म्हणावा लागेल.
वृक्षवाढीसाठी "अराउंड द वर्ल्ड'
विद्यार्थ्यांना गणितातील संख्याज्ञान, क्षेत्रफळ आदी संकल्पना स्पष्ट करून सांगता-सांगता डिसले सरांना एक अभिनव कल्पना सुचली. त्यांनी जवळीलच आकुंभे (ता. माढा, जि. सोलापूर) गावाची निवड करून प्रथम मुलांना त्या गावातील झाडांची गणती करायला सांगून प्रात्यक्षिकातून गणन शिकविले. त्यानंतर झाडाच्या बुंध्याशी सुतळी धरून त्या झाडाच्या फांद्यांच्या विस्तारापर्यंत लांब सुतळी धरून त्रिज्या, त्याच सुतळीने वर्तुळ काढून व्यास, क्षेत्रफळ आदी संकल्पना स्पष्ट केल्याच, पण गावातील वृक्षलागवडीखाली असणारे एकूण क्षेत्र किती, याचा आराखडा तयार केला. तो केवळ 21 टक्के एवढा भरला. तेव्हा पर्यावरणाच्या दृष्टीने तो 33 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी "अराउंड द वर्ल्ड' हा उपक्रम राबविला. यानुसार त्यांनी गावातील प्रत्येक झाडास एक "क्यूआर' कोड देऊन तो त्या झाडाच्या बुंध्यावर डकवला.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबरशी तो कोड जोडला. त्यामुळे, जर कोणी एखादे झाड तोडण्याच्या प्रयत्न केला तर त्या झाडाचा क्यूआर ज्या मोबाईलला कनेक्ट केलेला आहे, त्या मोबाईलवर रेड सिग्नल मिळू लागला. त्यामुळे लगेच त्या लोकेशनवर जाऊन झाड तोडणाऱ्या व्यक्तीस झाड तोडण्यापासून परावृत्त केले जाई. अगदीच झाड तोडणे अपरिहार्य असेल तर त्या व्यक्तीस पाच रोपे भेट देऊन ती इतर योग्य ठिकाणी लावून ती वाढविण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली जाते. याचा अतिशय चांगला परिणाम झाला आणि चार वर्षात आकुंभे गावातील वृक्ष लागवडीखालील क्षेत्र 33 टक्केपर्यंत वाढण्यास मदत झाली. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्षवाढीसाठी अवलंबलेल्या पद्धतीची अगदी अमेरिका, रशिया या देशांबरोबरच "यूनो'ने देखील दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर रणजितसिंह डिसले यांचा सन्मान करण्यात आला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल