वाचा... माढ्यातील दरोड्याचा पहाटे सव्वातीनच्या सुमाराचा थरार 

किरण चव्हाण
बुधवार, 22 जानेवारी 2020

चोरट्यांना रान मोकळे 
माढ्यात चोऱ्या व दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीरामनगर व सन्मतीनगर येथे दिवसा चोऱ्या झाल्या होत्या. साठे यांच्या वस्तीवरही दरोडा पडला होता. यामुळे माढ्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी तातडीने दरोडेखोरांचा शोध घेण्याची गरज आहे. माढ्यातील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद असल्याने चोरट्यांना रान मोकळे असल्यासारखी परिस्थिती आहे. 

माढा (जि. सोलापूर) : माढ्यात बुधवारी (ता. 22) पहाटे सव्वातीनच्या सुमारास दोन ठिकाणी पडलेल्या दरोड्यात सुमारे साडेचौदा तोळे सोने व रोख सुमारे दोन लाख असा पाच लाख 59 हजार 300 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. या घटनेत राधिका चवरे (वय 28) या महिलेने धाडसाने दरोडेखोरांचा पाठलाग केला पण चवरे यांच्या कपाळावर मारहाण करून दरोडेखोर पसार झाले. 

हेही वाचा - माढ्यात दरोड, महिला जखमी, 16 तोळे सोने लंपास 

याबाबत माढा पोलिसांत राधिका चवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की घराच्या दरवाजाच्या चौकटीवरील खिडकीतून हात घालून कडी उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दरोडेखोर घरात घुसतेवेळी जाग्या झालेल्या राधिका चवरे यांनी त्यांना तुम्ही कोण आहात, असे विचारले असता दरोडेखोर मराठी भाषेत म्हणाले, की तू शांत बस, आरडा ओरडा करू नको, नाहीतर तुझ्या मुलाला मारीन, तुझा जीव वाचवायचा नाही काय. यावर चवरे दरोडेखोराला म्हणाल्या, मला मारा, मी मरायला आले आहे, असे म्हणत सासऱ्याला नाना म्हणून हाका मारू लागल्या. यानंतर दोघांनी चवरे यांचे पती विनायक यांच्या गळ्याला चाकू लावून पकडले तर एकाने मुलाच्या गळाला चाकू लावला. तर एक दरोडेखोर कटर घेऊन चवरे यांना धमकवत होता. तर दुसऱ्या दरोडेखोराने घरातील कपाट तोडून सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. दरोडेखोर चवरे यांच्यासमोर येऊन हे बघ तुझे सोने घेऊन चाललो. तुझ्या गळ्यातील मणी मंगळसूत्र काढुन दे, असे म्हणाला. त्या वेळी चवरे दरोडेखोराला तुला बहिणी नाहीत का रे असे म्हणाल्या. यानंतर दरोडेखोर किल्ल्याकडील रस्त्याकडे पळू लागले. 

हेही वाचा - हिमालयातील पाहुणा पंढरपुराच्या भेटीला 

राधिका चवरे यांनी एवढ्या रात्री सुमारे 200 मीटर अंतरापर्यंत दरोडेखोरांचा पाठलाग केला. पाठलाग करताना एका चोरट्याने लाकडी दांडक्‍याने चवरे यांच्या कपाळावर मारले. तरीही त्यांनी आरडाओरडा करत पाठलाग केला. पण किल्ल्याजवळून चोरटे पसार झाले. परत येताना शेजारील लोक चवरे यांना हाका मारत होते. त्या वर चवरे लोकांना बाहेर या म्हणाल्या. परंतु शेजारील लोकांच्या घराला बाहेरून कड्या लावल्याने कोणाला बाहेर येता आले नाही. त्यानंतर चवरे यांनी शेजारील लोकांच्या घराच्या लोकांच्या कड्या उघडल्या. दरोडेखोर अंदाजे 30-35 वयोगटातील होते. त्यांनी स्वेटर व पॅंट घातलेली होती. मिठू वाघ यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी मागवलेले श्‍वानही रोकडोबा मंदिर परिसरात घुटमळले. त्यामुळे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. माढ्यातील सराफ गल्लीतही चोरीचा प्रयत्न झाला आहे. 

हेही वाचा - अनाथांच्या आरक्षणावर कोणी मारला डल्ला ! 

राधिका चवरे यांच्या घरातील चार तोळ्याच्या पाटल्या, चार तोळ्याचे गंठण, अर्ध्या तोळ्याची बोरमाळ, दीड तोळ्याचे लॉकेट, एक तोळ्याचे झुबे, अर्धा ग्रॅमची नथ, एक चांदीचा करंडा व रोख 800 रुपये असा एकूण तीन लाख 14 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे तर मिठू वाघ यांच्या घरातून रोख सुमारे दोन लाख रुपये व सुमारे 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold was stolen by robbing a house in madha city