
काल निकाल जाहीर होताच, ज्येष्ठ अभिनेत्री अकला कुबल आणि प्रचार केलेल्या परिचारक गटाचे पॅनेल बहुमतांनी विजयी झालं. यामध्ये नृत्यांगना माधुरी पवार यांच्यापेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी केलेला प्रचारच निर्णायक ठरला.
पंढरपूर (सोलापूर) : मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या आता राजकारणातही वरचढ ठरल्या आहेत. त्याचं झालं असं की, पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांनी स्टार प्रचारक म्हणून काम केलेलं पॅनेल बहुमतांनी निवडून आलं आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बाजी मारली आहे. निवडणुकी दरम्यान विजयासाठी अनेक राजकीय मातब्बरांनी प्रचारात आघाडी घेतली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक प्रश्न आणि समस्यांची चर्चा न करता, देश आणि राज्य पातळीवरील प्रश्नांनाच अधिक महत्त्व देत नेत्यांनी निवडणूक प्रचार केला. परंतु याला अपवाद ठरली ती पंढरपुरातील नारायण चिंचोली ग्रामपंचायत.
येथे निवडणूक प्रचारासाठी चक्क अभिनेत्रींनाच पाचारण करण्यात आलं होतं. येथे एका गटाने प्रसिद्ध नृत्यांगना आणि टीव्ही अभिनेत्री माधुरी पवार यांना प्रचारासाठी बोलावले होते. अभिनेत्री माधुरी पवार यांनी गावातून रोड - शो करत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर विरोधी परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनीही प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी माधुरी पवार यांना टक्कर द्यायची म्हणून "माहेरची साडी' फेम अभिनेत्री अलका कुबल यांना चक्क गावात आणून त्यांनाच प्रचारात उतरवले होते. त्यानंतर येथील निवडणूक निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
काल निकाल जाहीर होताच, ज्येष्ठ अभिनेत्री अकला कुबल आणि प्रचार केलेल्या परिचारक गटाचे पॅनेल बहुमतांनी विजयी झालं. यामध्ये नृत्यांगना माधुरी पवार यांच्यापेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी केलेला प्रचारच निर्णायक ठरला. येथील निवडणूक निकालानंतर आता मराठी चित्रपट क्षेत्रात सरस असलेल्या अलका कुबल आता राजकारणातही वरचढ ठरल्याची चर्चा चित्रनगरीत सुरू झाली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल