'केला असा आम्ही काय गुन्हा; पोटासाठी दिल्या तुम्ही मरण यातना, खाल्ले चार द्राक्षमणी म्हणून धाडीले यमसदनी मला !

The grape season has started in the entire district including Mohol taluka.jpg
The grape season has started in the entire district including Mohol taluka.jpg

वाळूज (सोलापूर) : सध्या मोहोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात द्राक्षांचा हंगाम सुरु आहे. ही पिकलेली द्राक्ष जशी माणसांना आवडते तशी ती पक्ष्यांनाही आवडतात. म्हणून विविध पक्षी बागेतील घडामधील द्राक्ष खातात. खाताना द्राक्षघडातील मणी चोचीने टोचा मारून फुटतात. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते.

द्राक्षघडांचे विविध पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी संपूर्ण बागेवर आणि द्राक्षबागेभोवती बारीक दुधी रंगाची लहान नायलॉन जाळीचे अच्छादन करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणारी ही जाळी पक्ष्यांच्या जीवावर उठली आहे. ही नायलॉन जाळी अत्यंत लहान धाग्यांची पांढुरक्या रंगात असल्याने ती पक्ष्यांच्या दृष्टीस पडत नाही. परिणामी त्या संरक्षक जाळीमध्ये पक्ष्यांचे पंख आणि पाय अडकून ते जखमी होऊन निकामी होत असल्याने त्यांना उडता येत नाही. तसेच पायामध्ये जाळे अडकल्याने आणि जाळीच्या दोऱ्याने पंख आणि पाय कापल्याने जखमी होऊन मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे पक्षांना धोका निर्माण झाला आहे. 

द्राक्ष बागेतील द्राक्षघडांतील मणी खाऊन विविध प्रकारचे पक्षी आपली भूक भागविण्यासाठी बागेवर बसण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्या बागेवर आणि बागेभोवती अंथरलेल्या जाळीमध्ये त्यांचे पाय, पंख, मान अडकून जायबंदी होतात. जाळीतून सुटण्यासाठी धडपड केल्याने त्यांचे पंख आणि पाय जाळीमध्ये अधीकच गुंतत जातात. पक्षी सुटण्यासाठी धडपड करतो, मात्र त्यामुळे लहान नायलॉनचा दोरा पंखात काचून पंखांना निकामी करतो. या नायलॉन दोऱ्यामुळे जखमी पक्षी होतात. त्यातून सुटका न झाल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो आहे. शेतकऱ्यांनी लहान नायलॉन जाळी लावण्यापेक्षा जाडसर मोठी जाळी लावावी ज्यामुळे पक्षी त्यात अडकणार नाही आणि बागेचेही नुकसान होणार नाही. 

सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष बागेची उत्पादनाचे प्रमाण वाढले असून हजारो हेक्टरवर द्राक्ष बागां उभ्या आहेत, तर ठिकठिकाणी नवीन बागांची लागवड होत आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू असून विविध प्रकारचे पक्षी आपली भूक भागावी म्हणून द्राक्षबागेतील द्राक्ष खाण्यासाठी जेव्हा उतरतात तेव्हा त्या जाळीमध्ये अडकून जखमी होऊन मृत्यू पावत आहेत.

मोहोळ तालुक्यातील वाळूजसह देगाव, मनगोळी, भैरवाडी, एकूरके, बोपले, येलमवाडी (ता.मोहोळ) तसेच भागाईवाडी, कळमण (उ.सोलापूर), बुद्रुकवाडी (ता.माढा) शिवारात शेकडो एकरावर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची लागवड केलेली आहे. या फळबागांवर विविध प्रकारचे रोग पडू नयेत, म्हणून शेतकरी विविध प्रकारची अतिशय विषारी औषधे फवारतात. त्या औषधांचा थर फळबागांच्या पानांवर फुलांसह फळांवर चिकटून राहतो. विविध पक्षी, प्राणी, किटक ही फळे खातात तेव्हा त्यांना विषबाधा होऊन पक्ष्यांसह, विविध प्रकारचे कीटक मारले जाऊन पर्यावरणासह सजीव सृष्टीची मोठी हानी होत आहे.

'या सृष्टीतील प्रत्येक सजीव हा जैव साखळीची एकएक कडी आहे. यातील एक जरी कडी निखळली तरी ही सजीवसृ सृष्टी धोक्यात येणार आहे. 
- 'भरत छेडा'नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com