पालकमंत्री भरणे उद्या करणार पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोटचा दौरा 

प्रमोद बोडके
Thursday, 18 June 2020

सोलापुरातील मृत्युदर चिंताजनक 
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या (बुधवारी रात्रीपर्यंत) 1897 झाली आहे. शहर व जिल्ह्यातील 154 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 971 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अद्यापही 772 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर हा सर्वाधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या (शुक्रवारी) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पंढरपूर, सोलापूर शहर, अक्कलकोट या ठिकाणी प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक ते घेणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत. 

सकाळी 11.30 वाजता पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात ते बैठक घेणार आहेत. दुपारी पावणे एक वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 4 वाजता पालकमंत्री भरणे अक्कलकोटकडे रवाना होणार आहेत. अक्कलकोट पंचायत समितीच्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 6 वाजता अक्कलकोट येथून ते इंदापूरकडे रवाना होणार आहेत. 

सोलापूर शहरात कोरोनाने थैमान घातले असताना आता ग्रामीण भागातही चिंता वाढू लागली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कुंभारी येथील नवीन विडी घरकुल, अक्कलकोट शहर व ग्रामीण, बार्शी शहर व ग्रामीण हे तीन भाग कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट झाले आहेत. या ठिकाणी कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या सर्वांचीच चिंता वाढवू लागली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Guardian Minister will fill it tomorrow Visit to Pandharpur, Solapur, Akkalkot