गुरुपौर्णिमाः मार्गदर्शकांच्या प्रेरणेमुळे त्यांचे जीवन नव्या आदर्शाने कसे घडले? ते वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 5 जुलै 2020

जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत विविध क्षेत्रांचा वारसा अशा पद्धतीने पोचतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या मार्गदर्शकांनी दिलेल्या प्रेरणांच्याबद्दल आठवणी मांडल्या. 

सोलापूरः व्यक्तीची जडणघडण होत असताना जीवनात कार्य करण्यासाठी अनेकांच्या प्रेरणा मिळत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामधून अनेक प्रकारची कार्ये विकसित होत असतात. जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत विविध क्षेत्रांचा वारसा अशा पद्धतीने पोचतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या मार्गदर्शकांनी दिलेल्या प्रेरणांच्याबद्दल आठवणी मांडल्या. 

हेही वाचाः पंढरपूर तालूक्यात आज आढळले सात कोरोनाचे रूग्ण

नाट्य व चित्रकलेच्या मार्गदर्शकांनी केली जडणघडण 
माझ्या जीवन प्रवासात काही व्यक्तींनी माझी जडणघडण केली आहे. 1984 मध्ये मी ज्या नाट्य संस्थेत शिकण्यास गेलो तेथे डॉ. वामन देगावकर यांनी या कलेची रुजवण माझ्यात केली. अनेक वर्षे मी नाट्यकलेचे धडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेत राहिलो. नंतर ते कोल्हापूरला स्थायिक झाल्याने हे शिक्षण पुढे थोडेसे थांबले. त्यांचे योगदान माझ्यासाठी मोलाचे आहे. मी ज्या चित्रकला महाविद्यालयात माझे शिक्षण पूर्ण केले व तेथेच पुन्हा नोकरीला लागलो. तेथेही प्राचार्य सु. रा. देवरकोंडा यांनी मला चित्रकलेचे अनेक बारकावे शिकवत माझा या कलेबद्दलचा दृष्टिकोन विकसित करण्याचे काम केले. एकपात्री प्रयोगाबद्दल पु. ल. देशपांडे व 'वऱ्हाड'कार लक्ष्मण देशपांडे हे ही माझे आदर्श राहिले. 'हास्यकल्लोळ' या प्रयोगाच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थाने सोलापूरकर व सोलापूर संस्कृतीला गुरू म्हणून काम केले. आपल्याला मार्गदर्शकाकडून जे काही ज्ञान व जडणघडणीची संधी मिळते त्यासाठी आपणही अधिक पात्र असण्याचा प्रयत्न हवा, हे मला प्रांजळपणे सांगावेसे वाटते. 
- दीपक देशपांडे (प्रख्यात नाट्य कलावंत) 

हेही वाचाः  पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप 

मार्गदर्शकाच्या प्रेरणेतून सुरू केले संस्थाकार्य 
शिक्षकी पेशात काम करत असताना, त्या संदर्भात दयानंद बीएड महाविद्यालयात असताना प्रा. सच्चिदानंद मोकाशी सरांची भेट झाली. ते गणितज्ञ व शिक्षण तज्ञ होते. नंतर नवोपक्रमाचे एक केंद्र तेथे सुरू झाले. नवे उपक्रम कसे असावे यासाठी त्यांनी आमची जडणघडण केली. या केंद्राच्या कार्यातून खऱ्या अर्थाने नवोपक्रमाचा पायाच आमच्या आयुष्यात रचला गेला. सेवाभाव म्हणून नोकरी केली पाहिजे हे तत्त्व त्यांनी आम्हामध्ये रुजवले. प्राचार्य ह. ना.जगताप यांनी शिक्षकी पेशा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रेरणा दिली. डीएड महाविद्यालयाचे ट्रस्टी असलेले के. डी.पाटील सरांची देखील भावी शिक्षक म्हणून आम्हाला दिशा दाखवण्यासाठी विशेष भूमिका होती. या सर्वांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी, ग्रामीण विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही सर (स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फौंडेशन) ही संस्था स्थापन केली. 
- बाळासाहेब वाघ (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक) 

दिग्गजांनी केली तालमीत जडणघडण 
सोलापूरमध्ये शालेय वयात मला तालमीची आवड निर्माण झाली. त्या वेळी तुकाराम लकडे वस्ताद व सुभाष वीर यांनी मला तालमीचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये असताना विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो. या मार्गदर्शनामुळे 1989 ला राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत 30 किलो वजनी गटात विजेतेपद मिळवता आले. त्यानंतर अनेक बक्षिसे शालेय कुस्ती स्पर्धामध्ये मिळवली. पुणे येथे रुस्तुम ए हिंद हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्या तालमीत कुस्तीचे धडे घेण्यास सुरवात केली. आधुनिक कुस्तीचे हे धडे आयुष्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले. त्या काळात हिंद केसरी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. राज्य व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धामध्ये मोठी कामगिरी बजावली. बिराजदार सरांनी तालीम करिअरची जडणघडण केली. पुढील काळात सुभाष दापकर व संतोष गवळी यांनी मला मार्गदर्शन केले. 
- भरत मेकाले (विभागीय सचिव, प. महाराष्ट्र विभाग, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद) 

शिक्षकांनी दिला नाट्यकलेचा वारसा 
मी सेवासदन प्रशालेत शिक्षण घेतले. या प्रशालेत त्यावेळचे मुख्याध्यापक वा. ऊ. सडवळकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नाट्यसंस्कार केले. त्यांच्यासोबत वनमाला किणीकर, शीला पत्की, सुधा कुलकर्णी व प्रतिभा देव यांनी देखील नाटकाचे विविध पैलू शिकवत बाल नाट्य चळवळीत संधी दिली. त्या वेळी सेवासदनमध्ये पिंपरकर नाट्य स्पर्धा होत असे. त्यामध्ये सेवासदनसह हरिभाई प्रशाला, सरस्वती मंदिर, ज्ञान प्रबोधिनी आदी शाळा सहभागी होत असत. या गुरुजनांनी माझ्यामध्ये नाट्यकलेची आवड निर्माण केली. पुढे सुधा कुलकर्णी यांनी तयार केलेल्या एका चित्रपटात देखील मला भूमिका करण्याची संधी मिळाली. नाट्यकलेचा हा वारसा रंग संवादच्या माध्यमातून आजही सुरू आहे. 
- मीरा राजेंद्र शेंडगे (ज्येष्ठ नाट्यकर्मी व संस्थापक, रंग संवाद) 

तेलंगवाडीतील शेती प्रयोगाने दिली प्रेरणा 
शेतीचे काम करीत असताना नेमके कशा पद्धतीने प्रयोग करावेत असा प्रश्‍न निर्माण झाला. तेव्हा मी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त तेलंगवाडीचे शेतकरी विश्‍वासराव कचरे यांच्याकडे गेलो. त्यांची शेती पाहिली. तेव्हा त्यांच्या शेतीमुळे खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. तेव्हा त्यांनी टमाटे लागवडीचा फार मोठा प्रयोग केला होता. आपणही आपल्या शेतीमध्ये काहीतरी उत्कृष्ट काम करून दाखवू शकतो, असा आत्मविश्‍वास मिळाला. कृषी अधिकारी भारत रामचंद्र चवरे यांनी देखील शेतीच्या संदर्भात अनेक बाबींवर चर्चा करून प्रोत्साहन दिले. मार्केटमध्ये फिरल्याने नवीन गोष्टींची माहिती झाली. ऍग्रोवनमुळे शेतीबद्दलची भूमिका अधिक भक्कम होऊ शकली. दादा साधू बोडके यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. 
-  परमेश्‍वर राऊत ( कृषीभुषण पुरस्कारप्राप्त शेतकरी ) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurupournima: How did the guide inspire his life with a new ideal? Read it in detail