सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 58 हजार हेक्‍टरमधील पिकांना फटका 

प्रमोद बोडके
Friday, 16 October 2020

बचाव कार्यासाठी 18 बोटी 
महापुरात अडकलेल्या व्यक्तींना व पशुधनाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या दहा बोट, कोल्हापूर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या चार बोट, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या दोन बोट व सोलापूर जिल्ह्यातील दोन बोटी अशा एकूण 18 बोटींच्या माध्यमातून बचाव कार्य करण्यात येत आहे. 505 व्यक्तींना व 48 जनावरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये 15 ऑक्‍टोबराला एकाच दिवशी सरासरी 93.60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा व माळशिरस या तालुक्‍यात एकाच दिवशी 100 मिलि मीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील 58 हजार 581 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. 

या पावसामध्ये सोयाबीन, कापूस, भाजीपाला, डाळिंब, कांदा, तूर, भुईमूग, बाजरी, ज्वारी, द्राक्ष, मका, उडीद, चारापिके, सूर्यफूल, पपई, केळी, कलिंगड या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 608 कुटुंबातील 32 हजार 521 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील 14 जणांचा मृत्यू झाला असून चार जण अद्यापही बेपत्ता आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील 829 जनावरांचा अतिवृष्टीमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 148 लहान तर 681 मोठी जनावरे आहेत. अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील 2 हजार 256 घरांची पडझड झाल्याचीही माहिती प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींना आवश्‍यकतेनुसार योग्य त्या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या राहण्याची व जेवण्याची सोय जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains hit crops in 58,000 hectares in Solapur district