अतिवृष्टीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 14 जणांचा मृत्यू, 17 हजार जणांचे स्थलांतर 

प्रमोद बोडके
Thursday, 15 October 2020

या तालुक्‍यांना सर्वाधिक फटका 
बार्शी, अक्कलकोट, माढा, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्‍याला महापुराचा सर्वाधिक फटका बसत आहे. बार्शी तालुक्‍यातील 137, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 9, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 37, अक्कलकोट तालुक्‍यातील 33, माढा तालुक्‍यातील 47, करमाळा तालुक्‍यातील 25, पंढरपूर तालुक्‍यातील 95, मोहोळ तालुक्‍यातील 41, मंगळवेढा तालुक्‍यातील 81, सांगोला तालुक्‍यातील 28, माळशिरस तालुक्‍यातील 32 अशा एकूण 565 गावांना महापूराचा फटका बसत आहे. अक्कलकोट तालुक्‍यातील 1 हजार 34, पंढरपूर तालुक्‍यातील 1 हजार 687 व माळशिरस तालुक्‍यातील 987 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनूसार सोलापूर जिल्ह्यातील चौदा जणांचा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपुरातील सात, बार्शीतील दोन, दक्षिण सोलापूरमधील एक, माढ्यातील चार जणांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील 565 गावांना महापूराचा फटका बसला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांसह मोठे ओढे दुथडी भरुन वाहू लागले आहेत. महापूरामुळे जिल्ह्यातील 4 हजार 522 घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. महापुरामुळे 4 हजार 731 कुटुंबातील 16 हजार 954 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नदी, नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे जवळपास 179 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या महापुरात आतापर्यंत 365 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 338 घरांची पडझड झाली आहे. 

महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व एनडीआरएफ यांच्यावतीने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. महापुराचा धोका असलेल्या गावांमधील जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, साखर कारखाना, समाज मंदिर अथवा बाधितांच्या नातेवाईकांच्या घरी, मठांमध्ये पुरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains kill 14 in Solapur district, displace 17,000