पूर्वा वाघमारे यांनी बदलला हिरजचा चेहरामोहरा ! आदर्श गावाची निर्मिती 

प्रमोद बोडके 
Monday, 21 December 2020

हिरज (ता. उत्तर सोलापूर) सोलापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेले गाव. त्यामुळे हिरज आणि सोलापूरचा रोजचा संपर्क. हिरजच्या सरपंचपदी पूर्वा वाघमारे यांना संधी मिळाली. इच्छाशक्ती, पाठपुरावा आणि गावाचा लोकसहभाग यामुळे त्यांनी अवघ्या पाच वर्षात हिरज गावाचा कायापालट करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे. 

सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) सोलापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेले गाव. त्यामुळे हिरज आणि सोलापूरचा रोजचा संपर्क. हिरजच्या सरपंचपदी पूर्वा वाघमारे यांना संधी मिळाली. इच्छाशक्ती, पाठपुरावा आणि गावाचा लोकसहभाग यामुळे त्यांनी अवघ्या पाच वर्षात हिरज गावाचा कायापालट करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे. 

राज्य व केंद्र शासनाच्या योजना गावात राबविण्यासाठी गावच्या प्रमुखामध्ये इच्छाशक्ती असेल आणि ग्रामस्थांनी एकीचे बळ दाखवून लोकसहभाग दिल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो, हेच हिरज गावाने सिद्ध केले आहे. अभिनेते आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या "सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेच्या माध्यमातून हिरजने आपल्या कर्तबगारीचा झेंडा महाराष्ट्रभर फडकावला आहे. स्वयंपूर्ण दत्तक खेडेगाव या माध्यमातून सोलापूर ग्रामीण पोलिसांनीही या गावाची निवड केली. गावासाठी नवीन नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने पाणी प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

चौदाव्या वित्त आयोगातून आरोग्य, शिक्षण, उपजीविका, महिला व बालकल्याण, मागासवर्गीय कल्याण ही देखील कामे झाली आहेत. या सर्व योजनांमुळे हिरज गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. हिरजमधून जाणारा केगाव रस्ता, हिरज ते देशमुख वस्ती रस्ता, हिरज ते तिऱ्हे रस्ता, हिरज रेल्वे लाइन ते हिरज पाटी या महत्त्वाच्या रस्त्यांचेही काम पूर्ण झाले आहे. आमदार निधी, जिल्हा परिषदेचा निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी यासह केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा निधी मिळवून या गावाचा कायापालट झाला आहे. 

पाच वर्षांसाठी हिरजची सरपंच म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे गावाच्या विकासात भर घालता आली. गावाचा लौकिक वाढविता आला. या सर्व कामाचे श्रेय ग्रामस्थांना आहे. 
- पूर्वा वाघमारे,
सरपंच, हिरज 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hiraj Sarpanch Purva Waghmare created an ideal village