यंदा लक्षवेधी पवित्र ज्योती उत्सव होणार नाही; 65 वर्षांपासूनची परंपरा कोरोनामुळे खंडित

श्रीनिवास दुध्याल 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शहरात 1954 मध्ये तोगटवीर क्षत्रिय समाजाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून अखंडित ज्योती उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सोमवार पेठ गट्टी फंड, पेद्दी फंड, जोडबवण्णा चौक येथील चिला फंड, नंगी फंड, डक्का फंड, चौडेश्‍वरी फंड, साखर पेठ गट्टी फंड व नलगेशी फंड असे आठ फंड पहाटे तीन वाजता सहभागी होतात. सोवळे नेसून सहभागी झालेल्या या फंडांमधील भाविकांच्या तालबद्ध स्तोत्रपठणाने परिसर भक्तिमय होऊन जातो. पहाटे पाच वाजता साखर पेठ येथे सर्व फंड एकत्र येऊन कन्ना चौकातील श्री चौडेश्‍वरी मंदिरात आरती करून ज्योती उत्सवाची सांगता होते. मात्र या वर्षी कोरोनामुळे सर्व उत्सव रद्द करण्यात आल्याने समाजबांधवांमध्ये अनुत्साह दिसत आहे. 

सोलापूर : दरवर्षी रक्षाबंधनचा सण साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तीनपासून पूर्वभागातील भाविकांचे आकर्षण असते ती तोगटवीर क्षत्रिय समाजाच्या पवित्र ज्योती उत्सवाचे. तालबद्ध ठेका धरून देवीची स्तोत्रं म्हणत या ज्योती उत्सवात सहभागी होणाऱ्या आठ फंडांचा हा ज्योती उत्सव या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती तोगटवीर क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण उदगिरी यांनी दिली. 

हेही वाचा : अजितदादांची नुसतीच घोषणा! "सिद्धेश्‍वर'च्या चिमणीचा 15 ऑगस्टपूर्वी फैसला 

कोरोना महामारीविरुद्ध सर्व जगच लढा देत आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या आदेशानुसार यंदाच्या वर्षी नारळी पौर्णिमेला होणारा पवित्र "ज्योती उत्सव' साजरा करण्यात येणार नाही. परंपरेप्रमाणे दरवर्षी नारळी पौर्णिमा व श्रावण शुद्ध षष्ठी हे देवी प्रतिष्ठापना दिवस मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरे केले जातात. परंतु कोरोना महामारी रोखण्यासाठी म्हणून मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या वर्षी प्रतिपदेपासून दुग्धाभिषेक तसेच दुर्गाष्टमी व पौर्णिमा होमहवन अशा सर्व पूजा समजाच्या वतीने नित्य नियमाने केल्या जातील; परंतु कोणत्याही पूजेवेळी पुढील दोन महिने मंदिरात सार्वजनिक दर्शनास बंदी राहील व नैवेद्यही स्वीकारले जाणार नाही, याची तोगटवीर क्षत्रिय समाज बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. उदगिरी यांनी केले आहे. 

हेही वाचा : बा विठ्ठला... मुक्‍या-बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला सुबुद्धी दे ! 

या विषयाकरिता घेण्यात आलेल्या बैठकीस समाजाचे उपाध्यक्ष रामचंद्र पुडूर, सहसचिव संतोष उदगिरी, खजिनदार नागनाथ कोंतम, सल्लागार समितीचे अरुण चिंता, आनंद बडगंची, डॉ. नारायण रंगम, श्रीनिवास गुर्रम आदी उपस्थित होते. 

65 वर्षांपासून सुरू आहे ज्योती उत्सव 
शहरात 1954 मध्ये तोगटवीर क्षत्रिय समाजाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून अखंडित ज्योती उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सोमवार पेठ गट्टी फंड, पेद्दी फंड, जोडबवण्णा चौक येथील चिला फंड, नंगी फंड, डक्का फंड, चौडेश्‍वरी फंड, साखर पेठ गट्टी फंड व नलगेशी फंड असे आठ फंड पहाटे तीन वाजता सहभागी होतात. सोवळे नेसून सहभागी झालेल्या या फंडांमधील भाविकांच्या तालबद्ध स्तोत्रपठणाने परिसर भक्तिमय होऊन जातो. पहाटे पाच वाजता साखर पेठ येथे सर्व फंड एकत्र येऊन कन्ना चौकातील श्री चौडेश्‍वरी मंदिरात आरती करून ज्योती उत्सवाची सांगता होते. मात्र या वर्षी कोरोनामुळे सर्व उत्सव रद्द करण्यात आल्याने समाजबांधवांमध्ये अनुत्साह दिसत आहे, अशी माहिती समाजाचे सहसचिव संतोष उदगिरी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The holy Jyoti festival of Togatveer Kshatriya Samaj will not be held this year