बापरे! प्रचंड नुकसानीमुळे होत आहे "या' कंपन्यांमध्ये कामगार कपात 

श्रीनिवास दुध्याल 
शनिवार, 27 जून 2020

लॉकडाउनमध्ये अनेक टूर्स रद्द झाले व आता लॉकडाउन शिथिलीकरणानंतर कोरोनाच्या भीतीमुळे नवीन देशांतर्गत व विदेशी टूर्सची बुकिंग होत नाही. उन्हाळ्यातील महत्त्वाचे सीझन हातातून गेल्यानंतर आता पावसाळी टूर्ससाठी बुकिंग होत नाही. दिवाळीच्या सुट्या मिळणार की नाहीत, याचीही शाश्‍वती नाही. प्रचंड नुकसान होत असल्याने कंपन्यांना प्रसंगी कामगार कपात करावी लागत आहे. 

सोलापूर : लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून ट्रॅव्हल्स व्यवसाय बंद आहे. लॉकडाउनच्या शक्‍यतेने 15 मार्चपासून 30 जूनपर्यंत देशांतर्गत व विदेशी सर्व टूर्स रद्द झाले. लॉकडाउननंतर शिथिलीकरणानंतर कुठलीही नवीन बुकिंग नाही. शासनाचे ट्रॅव्हल्स कंपन्यांसाठी गाइडलाइन्स मिळत नाहीत, तोपर्यंत ट्रॅव्हल्स व्यवसाय बंदच राहणार असल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पगार कपात व कामगार कपातीचे धोरण कंपन्यांना राबवावे लागत असल्याने अनेक कामगार बेरोजगार होत आहेत. 

हेही वाचा : "हे' म्हणतात, कोरोनाचा धोका काही महिने कायम, काम कसे करायचे? 

बुकिंग केलेल्या प्रवाशांना वर्ष-दीड वर्षात कधीही प्रवासाची मुभा 
मार्च ते जूनपर्यंत लग्नसराई, उन्हाळी सुट्यांमुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय तेजीत असतो. या कालावधीत हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, काश्‍मीर, दार्जिलिंग, सिक्कीम, सिमला, कुलू मनाली, नैनिताल, मसुरी या देशांतर्गतसह विदेशातील युरोप, सिंगापूर आदी टूर्सच्या बुकिंग फुल्ल असतात. मात्र लॉकडाउनमुळे या वर्षी या सर्व टूर्स रद्द झाल्या आहेत. ज्यांनी बुकिंग केली, त्यांना रिफंड न देता कंपन्यांनी प्रवाशांना एक वर्ष व दीड वर्षात कधीही प्रवास करण्याची मुभा दिली आहे. 

हेही वाचा : अरेरे..! लग्नसराईने दिली "यांना' हुलकावणी : वाचा सविस्तर 

ट्रॅव्हल्स कंपन्यांसमोर यापुढील अडचणी 

  • जून महिन्यात लॉकडाउन शिथिलीकरणानंतरही या व्यवसायासमोर अनंत अडचणी. 
  • पावसाळ्यातील गोवा, कोकण, लोणावळा आदींसह विदेशी प्रवासही झाले रद्द. 
  • राज्या-राज्यांतील लॉकडाउनचे नियम वेगवेगळे असल्यानेही प्रवास होताहेत रद्द. 
  • देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्याने प्रवाशांची होणार गैरसोय. 
  • दिवाळी सुट्या मिळणार की नाहीत व तोपर्यंत शासनाचे गाइडलाइन काय असतील यावर व्यवसाय अवलंबून. 
  • बुकिंग केलेल्यांना वर्ष-दीड वर्षात कधीही प्रवासाची सुविधा दिली पण तोपर्यंत कोरोनाची स्थिती काय असणार याची नाही शाश्‍वती. 
  • रेल्वे बंद असल्याने विमानाने प्रवास केल्यास क्वारंटाइन होण्याच्या भीतीमुळेही होताहेत विमान प्रवास रद्द. 

कोरोनाच्या भीतीमुळे टूर्सची बुकिंगच नाही 
लॉकडाउनमध्ये अनेक टूर्स रद्द झाले व आता लॉकडाउन शिथिलीकरणानंतर कोरोनाच्या भीतीमुळे नवीन देशांतर्गत व विदेशी टूर्सची बुकिंग होत नाही. उन्हाळ्यातील महत्त्वाचे सीझन हातातून गेल्यानंतर आता पावसाळी टूर्ससाठी बुकिंग होत नाही. दिवाळीच्या सुट्या मिळणार की नाहीत, याचीही शाश्‍वती नाही. प्रचंड नुकसान होत असल्याने कंपन्यांना प्रसंगी कामगार कपात करावी लागत आहे. 
- बसवराज मसुती, 
ट्रॅव्हल्स व्यावसायिक 

ट्रॅव्हल्स गाड्यांचे केले ऍम्ब्युलन्समध्ये रूपांतर 
लग्नसराई व उन्हाळी सुट्यांचे सीझन बुडाले. आता पावसाळ्यात कोकण, गोवा, लोणावळा या टूर्सची बुकिंगही होत नाही. सॅनिटायझर व एका वाहनात निम्मे प्रवासी घेऊन प्रवासास मान्यता आहे पण प्रवासी कोरोनाच्या भीतीने प्रवास करणे टाळत आहेत. नुकसान सहन करण्यापेक्षा आपत्कालीन सेवेसाठी काही गाड्यांचे रूपांतर ऍम्ब्युलन्समध्ये करून भाडे मारत आहोत. 
- विनायक विभूते, 
ट्रॅव्हल्स व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge losses in travel companies due to lockdown