अरेरे..! लग्नसराईने दिली "यांना' हुलकावणी : वाचा सविस्तर

श्रीनिवास दुध्याल 
शुक्रवार, 26 जून 2020

यावर्षी पहिल्या लग्नसराईच्या टप्प्यात एकही ऑर्डर नसल्याने व तयार साहित्याची विक्री न झाल्याने गुंतवलेले भांडवल, बॅंकांचे व्याज, कारागिरांचा पगार, त्यांना दरमहा ऍडव्हान्स यामुळे व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातील लग्नसराईपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यास व्यवसाय सुरळीत होईल; अन्यथा व्यावसायिकांसह कामगारही रस्त्यावर येतील. 

सोलापूर : या वर्षी पहिल्या टप्प्यातील मार्च ते जून हे लग्नसराईचे महिने लॉकडाउनमध्ये गेल्याने फर्निचर व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. कपाट, पलंग, सोफासेट, किचन रॅक व दिवाण आदी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी तयार करून ठेवले; मात्र एकही ऑर्डर नाही व एकाही साहित्याची विक्री झाली नसल्याने लग्नसराईच्या अख्ख्या सीझनने फर्निचर व्यावसायिकांना हुलकावणी दिली आहे. 

हेही वाचा : सोलापूरच्या ग्रामीण भागात उद्यापासून सलूनची दुकाने सुरू 

अलीकडे सर्व समाजातील गरीब असो वा श्रीमंत, विवाह समारंभात वधू पक्षाकडून कपाट, पलंग देण्याची प्रथा सुरू आहे. काही हौशी मंडळींकडून सोफासेट, दिवाण व किचन रॅक आदी साहित्य भेट म्हणून दिले जातात. याशिवाय घरगुती वापरासाठीही वर्षभर या साहित्यांना मागणी असते. मात्र लग्नसराईचे लक्ष्य ठेवून स्टील फर्निचर व्यावसायिक मोठ्या प्रमाणात हे साहित्य कामगारांकडून बनवून घेत असतात. कारण, ऐनवेळी मागणी आल्यावर लगेच हे साहित्य तयार करायला खूप कालावधी लागत असल्याने अगोदरपासूनच हे साहित्य तयार करून ठेवले जातात. 

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी जनतेची व भारतीय जवानांची माफी मागावी 

यावर्षी पहिल्या लग्नसराईच्या टप्प्यात एकही ऑर्डर नसल्याने व तयार साहित्याची विक्री न झाल्याने गुंतवलेले भांडवल, बॅंकांचे व्याज, कारागिरांचा पगार, त्यांना दरमहा ऍडव्हान्स यामुळे व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातील लग्नसराईपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यास व्यवसाय सुरळीत होईल; अन्यथा व्यावसायिकांसह कामगारही रस्त्यावर येतील, अशी चिंता स्टील फर्निचर व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 

कोरोना आटोक्‍यात आला तर ठीक... 
अख्ख्या लग्नसराईत एकही ऑर्डर नसल्याने यावर्षी खूप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शहरात 125 ते 150 स्टील फर्निचरचे कारखाने आहेत, त्यावर दीड ते दोन हजार कामगार अवलंबून आहेत. लॉकडाउनमुळे यूपी-बिहारचे कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. लॉकडाउननंतर आठवड्यातील तीन दिवस कारखाना सुरू राहात असल्याने कर्ज काढून पुढील सीझनची तयारी करत आहोत. तोपर्यंत कोरोना आटोक्‍यात आला तर ठीक, नाहीतर खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. 
- मजहर आडकी, 
स्टील फर्निचर कारखानदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steel furniture commercial losses during wedding season due to lockdown