
तंटामुक्त गाव विशेष शांतता पुरस्कारातून बक्षिसाच्या स्वरूपात मिळालेल्या निधीची वृक्ष लागवडीच्या नावाखाली उधळपट्टी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च दाखवण्यात आला आहे; मात्र आज रोजी एवढी झाडे गावात दिसून येत नसल्यामुळे ती गायब झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पानगाव (सोलापूर) : तंटामुक्त गाव विशेष शांतता पुरस्कारातून बक्षिसाच्या स्वरूपात मिळालेल्या निधीची वृक्ष लागवडीच्या नावाखाली उधळपट्टी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च दाखवण्यात आला आहे; मात्र आज रोजी एवढी झाडे गावात दिसून येत नसल्यामुळे ती गायब झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण नाईकवाडी यांनी तंटामुक्त गाव पुरस्कार रकमेच्या खर्चाविषयी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली होती, त्यातून ही बाब उघडकीस आली आहे. बार्शी तालुक्यातील पानगावला राज्य शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमे अंतर्गत 2009-10 ला विशेष शांतता पुरस्कार मिळाला होता. याद्वारे बक्षिसाच्या माध्यमातून गावाला सुमारे पावणेनऊ लाखांचा धनादेश देण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 2011-12, 2012-13 व 2013-14 या कालावधीत विविध ठिकाणाहून सुमारे 1230 झाडे बक्षिसाच्या रकमेतून खरेदी केल्याची माहिती देण्यात आली असून, यामध्ये वड, गुलमोहर, बकुळ, चिंच, करंज आदी वृक्षांचा समावेश आहे. वास्तविक पाहता, ही झाडे गावाच्या कुठल्या भागात लागवड केली आहेत याचा कुठेही उल्लेख दिलेल्या माहितीत नमूद केलेला दिसत नाही. त्यामुळे सध्या ही शेकडो झाडे कोठे आहेत, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे श्री. नाईकवाडी यांचे म्हणणे आहे.
सलग तीन वर्षे खड्डे खोदणे, वृक्षलागवड करणे अशा कामांवर हजारो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे, पण त्यांची ठिकाणे मात्र नमूद नाहीत. विशेष म्हणजे लागवडीसोबत दरवेळी वृक्ष संवर्धनाची देखील बिले काढली गेली आहेत.
अशा प्रकारामुळे राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी वृक्षलागवड मोहिमेचे व गाव विकासाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही, त्यामुळे या वृक्ष लागवडीच्या निधीचे नेमके काय झाले, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वरिष्ठ कार्यालायाकडे लेखी निवेदनाद्वारे करणार आहे.
- लक्ष्मण नाईकवाडी, माहिती अधिकार कार्यकर्ते
संपादन : श्रीनिवास दुध्याल