अकलूज, नातेपुते येथे कोविड सेंटर करण्याकडे दुर्लक्ष; कोरोनाबाधितांचे हाल 

सुनील राऊत 
Friday, 25 September 2020

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अडसर 
ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील दैनंदिन ओपीडी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळंतपणाच्या मुलीनी जायचे कुठे या गोंडस नावाखाली शासकीय वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी कोरोना कोविड सेंटर होऊ देत नाहीत. वास्तविक पाहता येथे असणारी ओपीडी लगतच्या शासकीय इमारतीमध्ये, शाळांमधून व जवळच असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीमध्ये बाळंतपणाच्या सुविधा होऊ शकते. मात्र तसे होताना दिसत नाही. 

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील आरोग्य विभागाच्या माहितीनुसार लोकसंख्या 5 लाख 26 हजार आहे. तालुक्‍यात एक उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालय व 12 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. माळशिरस तालुक्‍यात आज अखेर सुमारे चार हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तरीसुध्दा माळशिरस ग्रामीण रुग्णालय वगळता इतरत्र कुठेही कोरोना कोविड सेंटर शासनामार्फत सुरू झालेले नाही. शासनाचे कोरोना कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. मात्र तालुक्‍यात अकलूज, नातेपुते येथे कोरोना कोविड सेंटर सुरु करण्याबाबत सरकार उदासीन का आहे? असा सवाल तालुक्‍यातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे. 
माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना कोविड सेंटर सुरू झाले आहे. त्याठिकाणी 30 बेडची व्यवस्था झालेली आहे. तालुक्‍यातील महाळुंग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत, आनंदी गणेश कार्यालयाची इमारत व नातेपुते येथील मधूर मिलन या तीन ठिकाणी राज्य शासनातर्फे विलगीकरण कक्ष सुरू आहेत. त्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण असून याठिकाणी ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर कोणतीही उपकरणे नाहीत. फक्त रुग्ण येथे दाखल आहेत. येथे उपचाराची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे अनेक रूग्णांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. 
अकलूज येथील क्रिटिकेअर, संन्मती, डॉ. राणे कविटकर, डॉ. कदम, अश्विनी हॉस्पिटल व अकलूज शहरातील सर्व डॉक्‍टरांनी एकत्रित येऊन सुरू केलेले अकलूज कोरोना कोविड सेंटर याठिकाणी रूग्णांवर उपचार केले जात आहेत. ही सर्व रुग्णालये खाजगी असून याठिकाणी प्रत्येक रुग्णांना पैसे भरल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. कारण याठिकाणी शासनाच्या कोणत्याही सुविधा नाहीत. 
अकलूज येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालय असून याठिकाणी 100 बेडची मंजुरी आहे. तसेच नातेपुते येथेही ग्रामीण रुग्णालय आहे या दोन ठिकाणी कोरोना कोविड सेंटर सुरू करावे, अशी जनतेची व स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी आहे. परंतु सरकार व प्रशासन आपली जबाबदारी टाळत असून गोरगरीब जनतेने जायचे कुठे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ताबडतोब जनतेच्या मागण्यांची दखल घेऊन अकलूज, नातेपुते येथील शासकीय रुग्णालयात कोरोना कोविड सेंटर सुरू करावे, अशी स्थानिक जनतेची व स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी आहे. 
ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील दैनंदिन ओपीडी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळंतपणाच्या मुलीनी जायचे कुठे या गोंडस नावाखाली शासकीय वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी कोरोना कोविड सेंटर होऊ देत नाहीत. वास्तविक पाहता येथे असणारी ओपीडी लगतच्या शासकीय इमारतीमध्ये, शाळांमधून व जवळच असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीमध्ये बाळंतपणाच्या सुविधा होऊ शकते. मात्र तसे होताना दिसत नाही. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ignoring Kovid Center at Akluj Natepute