कोरोनाचा परिणाम : श्‍वसनक्षमता वाढवण्यासाठी वाढली सायकलींची मागणी 

Cycles
Cycles

सोलापूर : कोरोना संकटात प्रतिकारक्षमता व श्‍वसन क्षमतेबाबत निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे अचानक सायकल खरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. शाळा बंद असताना देखील सायकलची मागणी वाढली असून, सायकलचे काही मॉडेल सध्या बाजारात शिल्लक नाहीत. 

शाळा सुरू होत असताना आपल्या पाल्याला शाळेत जाण्यासाठी पालकांकडून सायकलची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. नागरिकांकडून सायकल खरेदी नियमित सुरू असते. कोरोना संकटाच्या काळात बाजारपेठेचे व्यवहार ठप्प असताना मात्र अचानक सायकलची मागणी वाढू लागली. जागतिक आरोग्य संघटना व केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने सायकलिंगमुळे भक्कम होणाऱ्या श्‍वसन क्षमतेच्या संदर्भाने सर्वसामान्यांचे लक्ष वेधले. कोरोना हा आजार श्‍वसन यंत्रणेशी निगडित असल्याने सायकलिंगबाबत नागरिकांमध्ये जागरूकता आली आहे. इतर व्यायामांच्या प्रकारामुळे केवळ स्नायू बळकट होतात, पण श्‍वसनाची क्षमता वाढती ठेवण्यासाठी सायकलिंग हा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून वापरला जाऊ लागला आहे. त्यामुळे सायकल राईड करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

मोठ्या प्रमाणात सायकलींचा वापर लॉकडाउनच्या फावल्या वेळात केला जाऊ लागला. श्‍वसनासाठी व्यायामाचा उत्तम प्रकार म्हणून याकडे पाहिले जाऊ लागले आहे. तसेच लॉकडाउननंतर आर्थिक बचत करण्याच्या दृष्टीनेही सायकल पर्याय म्हणून वापरला जात आहे. कमी अंतराच्या ठिकाणी काम करणाऱ्यांकडून मोटारसायकल ऐवजी सायकल वापरली जाऊ लागली आहे. एरव्ही बाजारपेठेतील दुकानांमध्ये ग्राहक कमी झालेला असताना सध्या दिवसाकाठी एका दुकानातून पाच ते दहा सायकलींची विक्री होत आहे. काही सायकल निर्मात्यांच्या निवडक सायकलींचा साठा देखील संपल्याने कंपन्यांकडून साठा नसल्याच्या सूचना विक्रेत्यांना मिळू लागल्या आहेत. काही सायकलींच्या सांगाड्यासाठी आयुष्यभराची गॅरंटी कंपन्यांनी दिली. सायकलिंगचा व्यायाम करणाऱ्या लोकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. 

सोलापूर सायकलिंग असोसिएशनचे सचिव भाऊराव भोसले म्हणाले, श्‍वसन क्षमता मजबूत करण्याच्या दृष्टीने सायकलिंगला सातत्याने प्रतिसाद वाढतो आहे. कोरोना संकटात सायकलिंगची आवड वाढीस लागली आहे. 

डॉ. हर्षवर्धन जोशी म्हणाले, सायकलिंगमुळे हृदयाच्या रक्त शुद्धिकरण व ऑक्‍सिजनेटिंगच्या क्षमता वाढतात. एका अर्थाने या क्षमतांची वाढ अत्यंत उपयुक्त असते. शेवटी सायकलिंग हा व्यायामाचा प्रकार असून तो निश्‍चित शरीरासाठी उत्तमच ठरतो. 

सायकल विक्रेते शीतल कोठारी म्हणाले, शाळांचा हंगाम नसताना देखील सर्वसामान्य ग्राहकांची सायकल खरेदीचा प्रतिसाद चांगलाच वाढला आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांसाठीची सायकल खरेदी आता सुरू झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com