विषय समित्या निवडीचा वाढला गुंता ! शिवसेनेचे हंचाटे अन्‌ मगर भाजपच्या गोटात; 'एमआयएम'ची वाढली चिंता 

14shivsena_bjp_ - Copy.jpg
14shivsena_bjp_ - Copy.jpg

सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्या निवडीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीसोबत 'एमआयएम' आ+णि वंचित बहुजन आघाडी हे सर्वजण भाजपविरोधात एकत्र आले. दुसरीकडे भाजपने 'एकला चलो रे' म्हणत संयमाची भूमिका घेतली. मात्र, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे व अनिता मगर हे भाजपच्या गोटात गेल्याने 'एमआयएम'कडील दोन्ही समित्या पराभूत होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

'एमआयएम'चे सदस्य घेतील बदला 
महापालिकेच्या सात विषय समित्यांसाठी उद्या (ता. 22) मतदान होणार असून, सभापती निवडीची सभा ऑनलाइन होणार आहे. प्रत्येक समित्यांमधील सदस्यांना हात वर करुन मतदान करावे लागणार आहे. तत्पूर्वी, सर्वप्रथम स्थापत्य या समितीसाठी मतदान होणार असून, ही समिती कॉंग्रेसकडे आहे. त्यानंतर शहर सुधारणा समिती व वैद्यकीय समितीसाठी मतदान होणार आहे. या दोन्ही समित्यांमध्ये 'एमआयएम'चे उमेदवार पराभूत झाल्यानंतर उर्वरित समित्यांसाठी या पक्षाचे सदस्य काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही सदस्यांनी आमचे उमेदवार पराभूत झाल्यास आम्हीही बदला घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. उद्यान, विधी, कामगार व समाजकल्याण आणि सर्वात शेवटी महिला व बालकल्याण समितीसाठी मतदान होणार आहे.

महापालिकेतील सात विषय समित्यांपैकी दोन समित्या शिवसेनेला घेऊन दोन्ही समित्यांवर अनिता मगर आणि भारतसिंग बडूरवाले यांना संधी द्यावी, अशी भूमिका राजकुमार हंचाटे यांनी घेतली. मात्र, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी स्वत:ची राजकीय सोय पाहत एकच महिला व बालकल्याण समिती शिवसेनेला घेतली, असा आरोप हंचाटे यांनी केला आहे. तत्पूर्वी, 'एमआयएम'ला महिला व बालकल्याण समिती देऊन संख्याबळानुसार समित्यांचे वाटप व्हावे, अशीही मागणी हंचाटे यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांचीही भेट घेतली. मात्र, तसे काहीच झाले नाही आणि हिच संधी भाजपने साधली. आमदार संजय शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर महाविकास आघाडीची घडी बसली. मात्र समित्या वाटपाचा मेळ बसलाच नाही. शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांनी भाजपतर्फे वैद्यकीय समितीसाठी अर्ज केला आहे. तर शहर सुधारणा समितीत सदस्य असलेले राजकुमार हंचाटे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'एमआयएम'ला मिळालेल्या दोन्ही समित्या अडचणीत सापडल्याने एमआयएमचे सदस्य आता मतदानावेळी काय भूमिका घेतात, याची उत्सुकता लागली आहे.

'वंचित'चा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय 
विस्कळीत पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, नगरसेवकांना भांडवली निधी नाही, दोन वर्षात एकदाही अंदाजपत्रक झाले नाही, झोन कमिट्यांची निर्मिती नाही, शहरातील अस्वच्छता, असे विविध प्रश्‍न सोडविण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरले. त्यामुळे शहरवासियांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीकडून वंचित आघाडीला मंडई-उद्यान समिती देण्याचा निर्णय झाला. मात्र शिवसेनेत बंडखोरी झाल्याने आता त्यांना ती समिती मिळणार का, याची उत्सुकता आहे. 

...तर कॉंग्रेसला मिळेल एकमेव समिती

महाविकास आघाडीच्या बैठकीत कॉंग्रेसने स्थापत्य आणि विधी या दोन समित्या घेतल्या आहेत, तर महिला व बालकल्याण समिती शिवसेनेकडे, मंडई व उद्यान समिती वंचित बहुजन आघाडीकडे, कामगार व समाजकल्याण समिती राष्ट्रवादीकडे आणि शहर सुधारणा व वैद्यकीय समिती एमआयएमला देण्याचे ठरले आहे. सुरवातीला स्थापत्य समितीची सर्वप्रथम निवडणूक होणार असल्याने ही एकमेव समिती कॉंग्रेसला मिळू शकेल. मात्र, त्यानंतर होणाऱ्या समित्या निवडीत 'एमआयएम'ला विजय न मिळाल्यास पुढील सर्वच समित्या भाजपला मिळतील, असा विश्‍वासही भाजप नेते व्यक्‍त करीत असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com