सोलापूर बाजार समितीमध्ये शेकडो शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा शेतमाल असुरक्षित 

Increased theft in Solapur market committee
Increased theft in Solapur market committee

सोलापूर : शेकडो शेतकरी, त्यांचा कोट्यवधींचा शेतमाल सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज येतो. मालाची सुरक्षितता म्हणून बाजार समितीने त्याठिकाणी सुरक्षारक्षक, वॉचमन नियुक्‍त केले आहेत. पोलिसांनाही गस्त वाढवावी, असे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. तरीही मागील दोन महिन्यात चार ते पाच आडत दुकाने फोडून चोरट्याने रोकड व शेतमाल लंपास केला आहे. यावर बाजार समितीच्या सचिवांनी तोंडावर बोट ठेवले आहे. 
राज्यातील टॉपटेन बाजार समितीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. उस्मानाबाद, लातूर, नाशिकसह अन्य जिल्ह्यांसह परराज्यातूनही शेतमाल याठिकाणी विक्रीसाठी येतो. मात्र, मागील काही वर्षांत बाजार समितीच्या प्रशासनाला शेतमालाची चोरी पूर्णपणे थांबविता आलेली नाही. आता चोरट्यांचे धाडस वाढले असून थेट आडत दुकानेच फोडले जात आहेत. बाजार समितीचा 105 एकराचा मोठा परिसर असून त्याठिकाणी सुमारे पाचशे आडत व्यापाऱ्यांचे गाळे आहेत. दरमहा शंभर कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल असलेल्या बाजार समितीतील व्यापाऱ्यांची दुकानेच सुरक्षित नसतील तर शेतमालाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. बाजार समितीने वॉचमन, गार्ड वाढविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तरीही चोरीचे प्रमाण कायम असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

व्यापाऱ्यांनी सीसीटिव्ही बसवावेत 
बाजार समितीचा परिसर मोठा असून सुरक्षिततेसाठी त्याठिकाणी शंभरहून वॉचमन, गार्डची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करतात. मात्र, बाजार समितीने बसविलेले बहुतांश सीसीटिव्ही कॅमेरे बंद पडले असून काही कॅमेरे काढून नेण्याचे प्रकार झाले आहेत. मागील काही दिवसांत बाजार समितीतील व्यापाऱ्यांची दुकाने फोडून दुकानांमधील शेतमाल तथा पैसे चोरीचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आडत व्यापाऱ्यांनी दुकानात व दुकानाबाहेर स्वत:च्या पैशातून सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, असा सल्ला बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. जेणेकरून चोरीचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

सातत्याने नाही पोलिसांची गस्त 
जेलरोड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा 105 एकराचा मोठा परिसर आहे. याठिकाणी बळीराजाचा शेतमाल उघड्यावरच ठेवलेला असतो. आडत व्यापाऱ्यांनी त्यांच्या गाळ्यातही शेतमाल ठेवलेला असतो. त्याचे राखण करण्यासाठी बाजार समितीचे वॉचमन, गार्ड नियुक्‍त केले आहेत. तरीही कांद्यासह अन्य शेतमालांची चोरी होतेच, हे विशेष. दुसरीकडे पोलिसांची रात्री दोनवेळा गस्त असते, असेही सांगितले जाते. मात्र, बऱ्याचवेळा पोलिसांच्या गस्तीत सातत्य नसल्याचेही बाजार समितीतील कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. बाजार समितीचे वॉचमन, गार्डचा पहारा आणि पोलिसांची गस्त असतानाही व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरी होतेच कशी, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com