सोलापूरच्या बाजारपेठेत अनलॉकनंतर वाढली उलाढाल 

Gold parsesing
Gold parsesing

सोलापूर ः मार्चपासून सुरू टाळेबंदीमुळे अनेक व्यावासियांवर संकट मंदीचे संकट कोसळले होते. जीवनावश्‍यक वस्तू वगळता कोणत्याही मालाला उठाव नव्हता. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत हळुहळू फरक पडत गेला असून उलाढाल वाढली आहे. सोने-चांदी, वाहन खरेदी व इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूच्या विक्रीत लक्षणिय वाढ झाली असून घरे खरेदीसाठी ग्राहकांकडून चौकशी व "बुकिंग'ला सुरवात झाली आहे. 

1 ऑक्‍टोबरच्या अनलॉकपासून सर्व बाजारपेठेतील उलाढाल वाढली असून इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूच्या विक्रीत 40 टक्के वाढ झाली आहे. दरमहा होणाऱ्या सरासरी वाहन विक्रीच्या 90 टक्के वाहने सप्टेंबरमध्ये विक्री झाली आहेत. सोने चांदीच्या व्यापाऱ्यांना ऐन अनलॉक सुरू होताच आलेला अधिक मास लाभदायक ठरला असून अधिक मासानिमित्त मोठ्या प्रमाणात सोने चांदीची विक्री झाली आहे. लॉकडाउन काळात ठप्प झालेल्या बांधकाम क्षेत्रालाही झळाळी असून आता घराच्या खरेदीसाठी बुकिंग सुरू झाले आहे. बांधकाम उद्योगालाही दसरा दिवाळीपासून बरे दिवस येतील असा अंदाज व्यावासायिकांना आहे. 

लॉकडाउन काळात ठप्प झालेल्या व्यवहारामुळे घरातच अडकलेल्या अनेकांना आतापर्यंत "लक्‍सरीयस' वाटणाऱ्या अनेक गृहोपयोगी वस्तू अत्यावश्‍यक होत आहेत. त्यामुळे टाळेबंदीनंतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स बाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 40 टक्केची वाढ झाली आहे. 

कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीचा फटका अनेक क्षेत्राला बसला. मात्र, त्यातून बाहेर पडत आता बाजारपेठा सावरताना दिसत आहेत. मार्चपासून बंद पडलेले व्यवहार आता सुरळीत होत आहेत. अनेक दुकानातून ग्राहकांची गर्दी वाढत आहे. लॉकडाउनमुळे अनेक वस्तूंची विक्री न झाल्याने व्यापारी चिंतेत होते. फ्रीज, कुलर, एसी यासह अन्य इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची मार्च, एप्रिल व मे या काळात सर्वाधिक विक्री होते. त्यामुळे या वस्तूंची घाऊक खरेदी करून व्यापारी विक्रीसाठी तयार होते. मात्र, मार्चमध्ये लॉकडाउन घोषीत झाल्याने त्या वस्तूंची विक्रीच झाली नाही. तो भुर्दंड कसा भरून निघणार या चिंतेत असतानाच लॉकडाउनने ग्राहकांचा "ट्रेंड' बदलला. नेहमी चैनीच्या व महागड्या वस्तू म्हणून त्याकडे लक्ष न देणारे सामान्य ग्राहक त्या वस्तू खेरदी करू लागल्याचे समोर आले. आता याच चैनीच्या वस्तू अत्यावश्‍यक झाल्याचे चित्र लॉकडाउनमुळे तयार झाले. 

मार्चपासून आतापर्यंत कोरोनामुळे सगळी बाजारपेठ थांबली होती. त्यामुळे बाजारपेठीतील उलाढाल मंदावली होती पण, अनलॉक सुरु झाल्यापासून त्यामध्ये मोठा फरक पडला आहे. येणाऱ्या दसरा-दिवाळीमध्ये जागे खरेदी विक्री व्यवसायाला चांगले दिवस येण्यास मदत होणार आहे. वाहने, सोने खरेदीत काहीअंशी सुधारणा झाली आहे. साध्या टीव्हीऐवजी अनेकांनी स्मार्ट टीव्ही खरेदीवर भर दिला. त्यामुळे अनेक दुकानातील माल संपून गोडावून रिकामे झाले आहेत. चार महिने मंदी असल्याने उठाव नसलेल्या वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर, मायक्रो ओव्हन, आटा मेकर, आटा चक्की व सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिशवॉशर या वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे या वस्तूंच्या विक्रीत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्के वाढ झाली. इलेक्‍टॉनिक्‍स वस्तूंच्या विक्रीसाठी महत्त्वाचा असणारा गुढीपाडवा, अक्षय्यतृतियाचा काळ वाया गेला तरी लॉकडाउननंतर झालेल्या विक्रीमुळे तो तोटा भरून निघाला असल्याचे चित्र दिसत आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इस्वर मालू यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या विक्रिसाठी मारक असणारा जून जुलैचा काळ तारक ठरला. दरवर्षी जून-जुलै महिन्यात शैक्षणिक सत्रामुळे त्या खरेदीवरच लोकांचा भर असतो मात्र यंदा शैक्षणिक सत्र सुरूच न झाल्याने ग्राहकांनी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू खेरदीसाठी खुपच चांगला प्रतिसाद दिला आहे. 

  • सोलापूरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू व संगणक विक्रीची सुमारे 200 दुकाने आहेत. 
  • मोबाईल कंपन्यांची सुमारे 100 दुकाने आहेत. 
  • गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जुन-जुलैमध्ये मोबाईल विक्रीत 40 टक्के वाढ 
  • यंदा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या विक्रित 30 टक्के वाढ 
  • ग्राहकांच्या मागणीमुळे अनेक गोडाऊन रिकामे झाले. 


वाहन विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर फुलू लागले हास्य 

सोलापुरातील वाहन विक्रीची बाजारपेठ पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. वाहन खरेदीसाठी ग्राहकांची दुकानांमध्ये रेलचेल वाढू लागली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता सोलापुरातील वाहन विक्रीची बाजारपेठ पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागली आहे. दसरा आणि दिवाळी हे दोन्ही मोठे सण तोंडावर असताना वाहन खरेदी-विक्रीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून वाहन विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू लागले आहे. 
ग्राहकांना सहजपणे वाहने घेता यावीत यासाठी बॅंक व फायनान्स कंपन्यांच्यावतीने ग्राहकांसाठी कमी व्याज दराच्या व कमी डाऊन पेमेंटच्या आकर्षक योजनाही आणल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ लागले आहे. बी. एस. -6 मधील नवीन तंत्रज्ञान आणि नवीन लुक असलेल्या दुचाकी पाहण्यासाठी व बुक करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे. 

सोलापूर शहरातील दुचाकी विक्रेते नितीन बिज्जरगी यांनी सांगितले की, 
कोव्हिडनंतर सुरु झालेल्या बाजारपेठांमध्ये वाहन विक्रीच्या बाबतीत येत असलेला अनुभव सकारात्मक आहे. दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर वाहन विक्रीसाठी मिळणारा प्रतिसाद खूप चांगला आहे. दरमहा होणाऱ्या सरासरी वाहन विक्रीच्या 90 टक्के वाहने सप्टेंबरमध्ये विक्री झाली आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने येत्या काळातही वाहन विक्रीचे मार्केट चांगले राहिल असा अंदाज आहे. 

चारचाकी वाहनांचे विक्रेते पृथ्वीराज गांधी यांनी सांगितले की, जून व जुलैच्या तुलनेत सप्टेंबर महिना आमच्यासाठी खूप चांगला गेला आहे. कोरोनाच्या संकटानंतर बाजारपेठ पूर्वपदावर आणणे हे सर्वांसाठीच एक आव्हान होते. या वर्षी सोलापूर शहर व जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. आपली अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून असल्याने यंदाच्या वर्षात बाजारपेठेत चांगली तेजी राहिल अशी अपेक्षा आहे. वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 

आकडे बोलतात..

  • दरमहा होणारी दुचाकी वाहनांची सरासरी विक्री : 4 हजार 
  • सप्टेंबरमध्ये झालेली सरासरी विक्री : 3500 ते 3600 
  • जिल्ह्यात असलेले एकूण विक्रेते : 23 
  • दरमहा होणारी चारचाकी वाहनांची विक्री : 400 ते 450 
  • सप्टेंबरमध्ये झालेली सरासरी विक्री : 200 ते 250 
  • जिल्ह्यात असलेले एकूण विक्रेते : 10 

बांधकाम व्यावसायिकांना 
आता दसरा-दिवाळीची आशा 

मार्चपासून आतापर्यंत कोरोनामुळे सगळी बाजारपेठ थांबली होती. त्यामुळे कोणीही जागेबाबत किंवा घराबाबत विचारणा करत नव्हते. पण, अनलॉक सुरु झाल्यापासून त्यामध्ये मोठा फरक पडला आहे. लोकांनी आता घरांची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात येणाऱ्या दसरा-दिवाळीमध्ये जागे खरेदी विक्री व्यवसायाला चांगले दिवस येण्यास मदत होणार आहे. आता व्याजाचे दर बॅंकांनी कमी केले आहेत. ते सात टक्‍यांपर्यंत आणले आहेत. त्यामुळे लोकांना घर खरेदी करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर सरकारने मुद्रांक शुल्कही तीन टक्‍यांनी कमी केले आहे. त्याचा फायदा लोकांना होणार आहे. अनलॉक झाल्यानंतर घर खरेदी करणाऱ्यांकडून बिल्डरांकडे घराची चौकशी सुरु केली आहे. आता चौकशी सुरु झाली आहे, म्हणजे दसरा-दिवाळीच्या काळात निश्‍चितच लोकांकडून घरांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्‍यता आहे. सध्या अधिक महिना सुरू आहे. या महिन्यातही बऱ्यापैकी खरेदी होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या काळानंतर या व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्‍यता आहे. 
 
बांधकाम व्यावसायिक राजेंद्र शहा-कांसवा यांनी सांगितले की, घर खरेदी योजनांमध्ये यंदाच्या वर्षी नव्याने काही स्कीम येण्याची शक्‍यता फार कमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 31 मार्चपर्यंतची मुद दिली आहे. त्यामुळे त्याचाही फायदा घर खरेदी करताना होणार आहे. याची मुदत आणखी वाढविली तर त्याचा लोकांना फायदा होईल. नव्या ज्या स्किम सुरु आहेत, त्यावरच खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील. 

सोन्या चांदीच्या बाजारपेठेला अधिकामासाचा चांगलाच लाभ झाला आहे. अनलॉक झाल्यानंतर लगेच आधिक मास आला. त्यासोबत चांदीचे व्यवहार या महिन्यात वाढले. अधिकामासाने बाजाराला चांगली सुरवात करून दिली. मोठ्या संख्येन महिलांनी चांदीच्या वस्तू खरेदी केल्या. कोरोनाची भीती बऱ्यापैकी कमी झाली आहे. सोन्याचे व्यवहार देखील सुरू झाले आहेत. सोन्याची मोड, खरेदी व विक्री सुरू झाली आहे. सर्वसाधारणपणे शहरातील बाजारात दररोजची उलाढाल एक ते सव्वा कोटी रुपयांची असते. एकाच महिन्यात ही उलाढाल अर्ध्याच्या पुढे सरकली आहे. आता नवरात्र, दिवाळी, लग्नसराईने बाजाराला आशा निर्माण झाली आहे. यावर्षीच्या जोरदार पावसामुळे येणारे शेती हंगाम चांगले झाले तर बाजारपेठेला खुपच अधिक चांगली दिशा मिळणार आहे. पहिल्याच महिन्यात नियमित व्यवहार अतिशय चांगले सुरू झाले आहेत. आता सराफा बाजार मागे वळून पाहणार नाही, असे सराफ व्यावासायिकांचे म्हणणे आहे. 

सराफ व्यावसायिक गिरीश देवरमणी यांनी सांगितले, की सराफ बाजारामध्ये महिनाभरात चांगल्या पद्धतीची उलाढाल सुरू झाली आहे. नवरात्र दिवाळी लग्नसराई पुढील काळात असल्यामुळे बाजार सावरला जाईल. अनलॉकनंतर सोलापूरच्या बाजारपेठेला झळाळी येत असून उलाढाल वाढली आहे. दसरा दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

महराष्ट्र सोलापूर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com