ब्रेकिंग! स्वातंत्र्यदिनी महापौरांनी जाहीर केले "हे' महत्त्वाचे निर्णय

Mahapalika
Mahapalika

सोलापूर : महापालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजवंदन करण्यात आले. महापौर श्रीकांचना यन्नम व मान्यवरांनी ध्वजवंदनानंतर संविधान वाचन करण्यात आले. या वेळी महापालिकेच्या वतीने कोरोना काळात मोलाचे योगदान दिलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून महापौर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी महापालिकेच्या कामगारांसाठी घेतलेले निर्णय जाहीर केले. त्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रशासनाने माहे सप्टेंबर 2020 च्या सर्वसाधारण सभेत प्रशासन प्रस्ताव सादर करत आहे. त्यास मंजुरीबाबत कारवाई करण्यात येईल. तसेच शासन निर्णयानुसार सोलापूर महापालिकेत झाडूवाली बिगारी व सफाई कामगार यांना लाड कमिटी शिफारसी लागू असून लाड कमिटी लागू असलेल्या पदांकरिता आकृतिबंधाची, स्थायी व अस्थायी पदाची अट लागू नसल्याने यापूर्वी मंजूर असलेल्या अधिसंख्या पदाच्या मर्यादित प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच वारसा हक्काने मंजूर प्रकरणातील प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या 12 वारसदारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. महापालिकेमध्ये कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला अनुकंपा तत्त्वाखाली नियुक्ती देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार अनुकंपा तत्त्वाखाली मंजूर प्रकरणातील प्रतीक्षा यादीतील कनिष्ठ श्रेणी लिपिक, शिपाई, मजूर, आया आदी उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. 

सोलापूर महापालिकेमध्ये 1995 नंतरही रोजंदारी सेवक कार्यरत आहेत. या सेवकांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यास सभेमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यरत असलेल्या सेवकांची माहिती घेऊन एक आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 1 सप्टेंबरपासून रोजंदारी सेवकांना प्रतिदिन 20 रुपये वाढ करण्यात येत आहे. तसेच सोलापूर महापालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व रोजंदारी सेवक, मानधन स्थायी, अस्थायी या सर्वांना एक लाख रुपयांचे कॅशलेस (मेडिक्‍लेम) एक सप्टेंबरपासून कुटुंबाच्या व्यक्तीप्रमाणे लागू करणार आहे, असे अनेक निर्णय आज महापौरानी स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर केले. या निर्णयांचे स्वागत करत महापालिका कामगार कृती समिती तसेच इतर कामगार संघटनांनी महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी. शिवशंकर यांचे आभार मानले. 

या वेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, परिवहन सभापती जय साळुंखे, महिला व बालकल्याण सभापती कुमुद अंकाराम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, गटनेते आनंद चंदनशिवे, रियाज खैरादी, नगरसेवक विनोद भोसले, अविनाश बोमड्याल, भारतसिंग बडूरवाले, नगरसेविका श्रीदेवी फुलरे, निर्मला तांबे, उपायुक्त पंकज जावळे, उपायुक्त धनराज पांडे, उपायुक्त अजयसिंह पवार, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे पाटील, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, प्रसाशन अधिकारी कादर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 

घरबसल्या करा महापालिकेत तक्रार 
नागरिकांना महापालिकेत अथवा विभागीय कार्यालयात येऊन त्यांची नागरिक समस्या मांडण्याऐवजी घरबसल्या ऑनलाइन नोंदवून त्या किमान कालावधीमध्ये संबंधित विभागाकडून सोडवण्यासाठी चेंज माय सिटी हे ऑनलाइन ऍप 1 सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात येत आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. 

महत्त्वाची घोषणा... 

  • एक सप्टेंबरपासून नगरसेवक, रोजंदारी सेवक, मानधन स्थायी, अस्थायी या सर्वांना एक लाख रुपयांचे कॅशलेस (मेडिक्‍लेम) 
  • महापालिकेतील रोजंदारी सेवकांना प्रतिदिन 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय 
  • अनुकंपा तत्त्वाखाली मंजूर प्रकरणातील प्रतीक्षा यादीतील कनिष्ठ श्रेणी लिपिक, शिपाई, मजूर, आया आदी उमेदवारांना नियुक्ती आदेश 
  • महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रशासनाने सप्टेंबर 2020 च्या सर्वसाधारण सभेत पूर्वी सविस्तर प्रशासन प्रस्ताव सादर करत आहे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com