"अहो, ते आमच्या गावचे नाहीत, त्या गावचे हाईत..!' कोरोनावरून गावकऱ्यांत रंगतोय संवाद; प्रशासनाच्या अहवालामुळे संभ्रम

Villagers
Villagers

मरवडे (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यात कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या रुग्णांची माहिती सादर करीत असताना ग्रामीण भागातील माहिती ही प्रत्येक गावची सादर न करता "प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या गावचे इतके रुग्ण' अशा स्वरूपात सादर केली जात आहे. गावात रुग्णच नसताना त्या गावातील रुग्णांची संख्या प्रसिद्ध होत असल्याने "अहो, ते आमच्या गावचे नाहीत, त्या गावचे हाईत...' असा संवाद गावकऱ्यांत होताना दिसत आहे. तालुका प्रशासनाच्या अहवालामुळे ग्रामस्थांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

मंगळवेढा तालुका प्रशासनाकडून दररोज कोरोना चाचणी अहवाल प्रसिद्ध केला जात आहे. या अहवालात वैद्यकीय रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा यांच्यामार्फत कोरोना रुग्णांच्या संपर्कातील गावनिहाय घेण्यात आलेल्या व्यक्तींची स्वॅब चाचणी संख्या, रॅपिड अँटिजेन चाचणीच्या माध्यमातून आलेली पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांची संख्या, सोलापूर येथून प्राप्त स्वॅब तपासणी अहवाल तसेच तालुक्‍यातील पॉझिटिव्ह रुग्ण, बरे झालेले व उपचार घेत असलेले रुग्ण, मयत रुग्ण यांची माहिती सादर केली जाते. सोमवारी (ता. 27) सलगर तीन, बोराळे चार, मरवडे तीन, असे एकूण 10 अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. 

चीनची अभेद्य भिंत पार करून जगभर पसरलेला कोरोना विषाणू आपल्या गावची वेस ओलांडून गावात आला असल्याचे समजताच मरवडेसारख्या तालुक्‍यातील मोठ्या गावातही एकच धांदल उडाली. रुग्ण कोण, कोणाच्या संपर्कातील, रुग्ण सापडलेले क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले काय, आता प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी असताना घरोघरी आरोग्य तपासणी होणार का, गाव बंद कधीपासून आहे... अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती गावकऱ्यांत होऊ लागली आहे. मरवडेबरोबर सलगर, बोराळे येथील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना काही सुज्ञ ग्रामस्थांनी अधिक चौकशी केली असता हे रुग्ण मरवडे, सलगर, बोराळे गावातील नसून या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अन्य गावातील असल्याचे समजले. 

रुग्ण आपल्या गावातील नसून इतर गावातील असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आज गावात कोरोना रुग्ण आढळून आले नसले तरी भविष्यात कोरोना आपल्याही गावात प्रवेश करू शकतो, हे ध्यानी घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे निश्‍चित करत "अहो, ते आमच्या गावचे नाहीत; त्या गावचे हाईत' हे इतर गावातील ग्रामस्थांना सांगण्यासही गावकरी विसरले नाहीत. कोरोना तपासणी अहवालामुळे ग्रामस्थांत संभ्रमावस्था निर्माण होऊ नये यासाठी गावनिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. 

सोमवार (ता. 27) अहवालातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या व गाव : सलगर - 3, बोराळे - 4, मरवडे - 3. 
प्रत्यक्षातील गाव व रुग्णसंख्या : बावची - 3, मुढवी - 4, फॅबटेक शुगर कॉलनी कात्राळ - 3. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com