"सिद्धेश्‍वर' चिमणीचा विषय त्वरित मार्गी लावा ! पालक सचिव रेड्डींनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा 

प्रमोद बोडके 
Saturday, 9 January 2021

सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी व उद्योग वाढीसाठी विमानतळाचा विषय महत्त्वाचा आहे. सोलापूर शहरातील विमानतळाच्या शेजारी असलेल्या सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय त्वरित मार्गी लावा, अशा सूचना सोलापूरचे पालक सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी दिल्या. 

सोलापूर : सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी व उद्योग वाढीसाठी विमानतळाचा विषय महत्त्वाचा आहे. सोलापूर शहरातील विमानतळाच्या शेजारी असलेल्या सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय त्वरित मार्गी लावा, अशा सूचना देत, सोलापुरात सुसज्ज विमानतळ असेल तरच गुंतवणूकदार, उद्योगपती या ठिकाणी येतील, असा विश्‍वास सोलापूरचे पालक सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी व्यक्त केला. 

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे श्री. रेड्डी यांनी शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, माता व बाल संगोपन अधिकारी तथा कोरोना लसीचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांच्यासह सर्व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

श्री. रेड्डी यांनी जिल्ह्यातील कोव्हिड लसीकरण तयारी, केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाच्या योजना, रोजगार हमी, स्वयंरोजगार, उद्योग, विमानतळ याबाबत सविस्तर आढावा घेतला. रब्बी पीक कर्जासाठी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीकडे (एसएलबीसी) पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले. 

बैठकीतील ठळक मुद्दे 

  • सर्वोपचार रुग्णालयात येणार नवीन मशिन 
  • नव्या मशिनद्वारे होणार रोज 1,500 कोरोना चाचण्या 
  • जिल्ह्यातील 21 डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल बंद 
  • आयटी पार्कसाठीही शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन 
  • उड्डाण पुलासाठी भूसंपादन, अंतर्गत गटारीसाठी निधीची मागणी 

जिल्हाधिकाऱ्यांच्या मागण्या 
सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे नव्या इमारतीत स्थलांतरण करण्यासाठी आवश्‍यक असलेला निधी, महिला व बालकांसाठी सोलापुरात होणाऱ्या नव्या शासकीय रुग्णालयासाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बैठकीत पालक सचिवांकडे केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of chimney of Siddheshwar Sugar Factory was raised by Guardian Secretary Reddy