सावधान.. जनता कर्फ्यू संपले तरी जमावबंदी आहे!

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

- अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने राहणार बंद 
- रिक्षा वाहतुकीलाही बंदी 
- ठोस कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई 
- बॅंका, पेट्रोल पंप चालू राहणार 
- अंत्यविधीला 50 व्यक्तींची मर्यादा 
- खाद्यपदार्थ बनवून पार्सल देण्यास परवानगी 
- घरपोच सेवा देणाऱ्यांना बंदी नाही

सोलापूर : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सोमवारपासून सोलापूर शहरात 144 कलमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून पाचपेक्षा अधिक जण एकत्र आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणात शहरात 45 तर ग्रामीण भागात 92 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. 

कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून एकूण 92 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात एकूण एक हजार 800 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जीवनावश्‍यक वस्तू वगळून सर्व दुकाने व कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश असतानाही काही ठिकाणी दुकाने चालू ठेवण्यात येत आहेत. पान टपऱ्या, वडापाव सेंटर, मॉल्स, हॉटेल, खानावळ, टेलर, सलून, रसपानगृह, जनरल स्टोअर्स, आइस्क्रीम पार्लर, गॅरेज, हार्डवेअर, इलेक्‍ट्रिकल दुकान, फूट वेअर आदी एकूण 92 दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यापूर्वीच अफवा पसरविणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे. बार्शी येथील एकाने जमावबंदीचा आदेश असतानाही क्रिकेटचे सामने भरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जनता कर्फ्यूसाठी एकूण 132 ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आले होते. 180 ठिकाणी पेट्रोलिंगसाठी पोलिस नियुक्त केले होते. 

कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून दुकाने चालू ठेवल्याप्रकरणात शहर पोलिसांनी नव्याने 45 गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई शनिवारी रात्रीपासून रविवारी रात्रीपर्यंतची आहे. या कारवाईत चहा कॅन्टीन, लंच होम, हेअर सलून, बेकरी, हॉटेल, झेरॉक्‍स सेंटर, पेंटचे दुकान, गॅरेज, टेलर, सर्व्हिसिंग सेंटर, पान दुकान, लॉन्ड्री, वेल्डिंग दुकान यांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी रात्री नऊ वाजता जनता कर्फ्यू संपल्यानंतर सोमवारी पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश पोलिस आयुक्तांनी काढला होता.  

हे माहिती आहे का? 
- अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने राहणार बंद 
- रिक्षा वाहतुकीलाही बंदी 
- ठोस कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई 
- बॅंका, पेट्रोल पंप चालू राहणार 
- अंत्यविधीला 50 व्यक्तींची मर्यादा 
- खाद्यपदार्थ बनवून पार्सल देण्यास परवानगी 
- घरपोच सेवा देणाऱ्यांना बंदी नाही

रविवारच्या जनता कर्फ्यूला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालनही नागरिकांनी केले. सोमवारपासून 31 मार्चपर्यंत 144 कलम लावण्यात येत आहे. यात अत्यावश्‍यक सुविधा वगळता इतर दुकाने बंद असतील. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jamawbandi in solapur