सोलापूर जनता बॅंकेने आणली जनाधार, सोने तारण कर्ज योजना 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 22 जून 2020

शैक्षणिक कर्ज योजना अत्यंत सुटसुटीत व सोपी करण्यात आली असून सभासद, ग्राहक व कर्जदारांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. सध्याच्या महागाईच्या काळात शैक्षणिक शुल्क, साहित्य, प्रवास, राहणे आदी सर्व प्रकारचे खर्च या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च / तांत्रिक शिक्षण घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या सोलापूर जनता सहकारी बॅंकेच्या शाखेशी संपर्क साधावा. 
- किशोर देशपांडे, चेअरमन, सोलापूर जनता सहकारी बॅंक 

सोलापूर : कोरोनामुळे आलेल्या संकटाला सक्षमपणे उत्तर देण्यासाठी पगारदार कर्मचारी व छोट्या व्यावसायिकांसाठी सोलापूर जनता सहकारी बॅंकेने अनेक कर्जयोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये "जनाधार' आपत्कालीन विनातारण कर्ज योजना रुपये दोन लाखांपर्यंत असून शाळा, कॉलेज, कंपनी कर्मचारी तसेच सर्व छोटे व्यावसायिक व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या कर्जाची मुदत 36 महिने असून केवळ 13 टक्‍के एवढ्या व्याजदरात उपलब्ध आहे. कमी कागदपत्रात त्वरित अर्थसहाय्य व सामान्य जनतेला संकटातून सक्षमपणे बाहेर येण्यासाठी या कर्जयोजनेचा 
लाभ घेता येईल. 

यासोबतच सोनेतारण कर्ज योजना केवळ 10 टक्के व्याजदरात कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी बॅंकेने सुरू केली आहे. हे कर्जदेखील सामान्य ग्राहकांना एका दिवसात मिळू शकेल. सोनेतारण कर्जासाठी जामीनदाराची आवश्‍यकता नाही व प्रोसेसिंग फीदेखील बॅंकेने आकारलेली नाही. याशिवाय बॅंकेने शैक्षणिक कर्ज योजना रुपये 40 लाखांपर्यंत सुरू केली असून त्याचा व्याजदर केवळ 12 टक्के आहे. विद्यार्थिनी, मुलींच्या शिक्षणासाठी या व्याजदरात अर्धा टक्का विशेषतेने सूट देण्यात आली असून, मुलींसाठी व्याजदर 11.50 टक्के असणार आहे. सामान्य जनतेची आर्थिक गरज भागवण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बॅंकेने विशेष करून या कर्जयोजना आणलेल्या आहेत, त्याचा ग्राहकांनी, सभासदांनी व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे, उपाध्यक्ष वरदराज बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वाईकर तसेच संचालक मंडळ, बॅंकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janadhar, Gold Mortgage Loan Scheme introduced by Solapur Janata Bank