
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतीपंपाचे, व्यवसायधारक व घरगुती वीजबिल शंभर युनिटपर्यंत माफ करणार असे अश्वासन दिले होते; ते न पाळता जनतेचा विश्वासघात करून येत्या 20 नोव्हेंबरपासून वीजबिलाच्या वसुलीचा आदेश दिला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो अन् ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मंत्रालयात खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.
मोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले असल्याने शासनाने लॉकडाउन लागू केला. अशा परिस्थितीत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतीपंपाचे, व्यवसायधारक व घरगुती वीजबिल शंभर युनिटपर्यंत माफ करणार असे अश्वासन दिले होते; ते न पाळता जनतेचा विश्वासघात करून येत्या 20 नोव्हेंबरपासून वीजबिलाच्या वसुलीचा आदेश दिला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो अन् ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मंत्रालयात खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यामध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले असताना सहा ते सात महिने लॉकडाउन काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता व विविध व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत. पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. उद्योगधंदे बंद होते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला त्या वेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत वीजबिल माफ करणार व व्यवसायधारकांना स्थिर आकार शून्य लाइट बिल देणार असे जाहीर केले होते. असे असताना, व्यवसायधारकांची वीजबिले वसुली केली आहे. ती बिले माफ करून त्यांच्या खात्यावर जमा करावीत, तसेच शेतकऱ्यांचे, व्यावसायिक, उद्योगधंद्यांचे व घरगुती वीजबिल शंभर टक्के माफ केले पाहिजे. पारीत केलेला आदेश त्वरित माघारी घेऊन शेतकऱ्यांना व जनतेला दिलासा द्यावा.
गेल्या महिन्यात अतिवृष्टी व आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा व पिके वाहून गेली आहेत. सर्वसामान्य शेतकरी, नागरिक आयुष्यातून उठला आहे. त्यामुळे जनतेने दिलेल्या सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्यांच्या कामासाठी करावा. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात जातीने लक्ष घालून हे वीजबिल माफ करावे; अन्यथा ऊर्जामंत्र्यांना मंत्रालयातील खुर्चीवर बसू देणार नसल्याचा इशारा देशमुख यांनी दिला. दरम्यान, थकीत वीजबिल शेतकऱ्यांनी व व्यवसायधारकांनी भरू नये, असे अवाहनही देशमुख यांनी केले.
या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, युवक अध्यक्ष श्रीकांत नलवडे, चंद्रकांत निकम, रघू चव्हाण, बलभीम माळी, पप्पू दत्तू, अण्णासाहेब वाघचौरे, सुनील पुजारी, रवींद्र मुठाळ, अंकुश वाघमारे, जिल्हा युवकचे नानासाहेब मोरे, मारुती भुसनर, सचिन आटकळे आदी उपस्थित होते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल