जयंत पाटील का म्हणाले वरचा अधिकारी, खालचा अधिकारी असा वाद नको

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

सोलापूर शहरासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, आणि समजा असा निर्णय झालाच तर सध्या काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना वाईट वाटणार नाही. कारण या ठिकाणी नियुक्त केले जाणारे अधिकारी हे सोलापूरातील अधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ असणार आहेत.  सोलापुरात वरचे अधिकारी आणि खालचे अधिकारी असा वाद निर्माण करू नका, असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

सोलापूर : सोलापूर शहरासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, आणि समजा असा निर्णय झालाच तर सध्या काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना वाईट वाटणार नाही. कारण या ठिकाणी नियुक्त केले जाणारे अधिकारी हे सोलापूरातील अधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ असणार आहेत.  सोलापुरात वरचे अधिकारी आणि खालचे अधिकारी असा वाद निर्माण करू नका, असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. 
सोलापूर शहरात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या,  प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी बैठक घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार मी सोलापुरात बैठक घेण्यासाठी आलो आहे. सोलापुरात सध्या असलेले अधिकारी हे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही चुका होताना दिसत नाहीत. त्यामुळे 15 दिवसात सोलापुरातील कोरोनाची स्थिती बदललेली दिसेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. सोलापुरात रुग्ण वाढू नयेत, कोरोना चाचणीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्वॅबपूर्वी काही उपाययोजना करता येतील का? ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत त्याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करून आणखी कठोर उपाय योजना केल्या जातील का? याबाबत आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil held a meeting in Solapur