शेतकऱ्यांसाठी 23 वर्षे अनवाणी फिरणारे : कर्मयोगी गोविंद बापू पाटील 

Govind Bapu Patil.jpg
Govind Bapu Patil.jpg



करमाळा तालुक्‍यातील लव्हे या छोट्याशा गावात गोविंदबापू पाटील यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1931 रोजी झाला. 
कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचे नुकतेच 20 जुलै 2020 रोजी निधन झाले. अनेक संकटांना सामोरे जात अखेर श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी बापूंनी केली. राज्याच्या सहकारक्षेत्रात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलं. गोविंदबापू एक मौलिक त्यागाचे जीवन जगले. 
करमाळा तालुक्‍यात ज्या मोजक्‍या लोकांचे नाव आदराने घेतले जाते त्यात गोविंद बापू पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. 
बापू हे सामाजिक जीवनातील सर्वासाठी आदर्श होते. त्यांच्या जाण्याने तमाम शेतकरी, शेतमजूर व कामगार पोरका झाला आहे. पाच दशकांपूर्वीचा काळ वेगळा होता. संगणकाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा लवलेश सुध्दा नव्हता. करमाळा तालुका हा पारंपारिक शेतीवरच अवलंबून होता. भीमा नदीकाठची गावं तेव्हाही सुखी होती. पण धनसंपन्न नव्हती. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे भरघोस उत्पन्न घेतले जायचे. पण अपेक्षेइतका पैसा शेतकऱ्यांच्या हाती उरत नव्हता. अशातच तत्कालिन सरकारने उजनी धरणाचा प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प अजून प्रत्यक्षात साकारण्याअगोदरंच बापुंच्या दूरदृष्टीने एक स्वप्न पाहिलं. करमाळा तालुक्‍यातही सहकारी तत्त्वावर चालणारा एक साखर कारखाना असावा, असं बापूंना वाटू लागलं. त्यावेळी शेतकरी आपल्या दैनंदीन जीवनात व पारंपारीक शेतीत मग्न होता. राजकीय पुढारी विकास या संकल्पनेशी जास्त बांधिलकी बाळगून नसावेत. साहाजिकच बापूंच्या कारखाना उभारणीची टिंगलंच सर्वत्र होत असायची. पण बापू खचले नाहीत. उलट तन मन व वेळप्रसंगी धन अर्पण करत त्यांनी या कारखाना उभारणीसाठीची कागदपत्रे जमवण्यास सुरवात केली. या कामास आपले दैनंदिन कामकाज मानले. सूर्य उगवला की त्याच नव्या उमेदीने कागदपत्रांची पिशवी खांद्याला अडकवून घराबाहेर पडायंचे. जेमतेम शिक्षण असल्याने प्रत्येक कामाअगोदर त्याबद्दल एखाद्या जाणकारांकडून माहिती घ्यायची व आपल्या कामाशी गाठ घालायची हा बापुंचा नित्यक्रम झाला. 
अंगी नम्रता व मनात जिद्द असल्याने बापुंची उमेद कधी खचली नाही. त्यावेळी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, रावसाहेब पाटील, गिरधरदास देवी, पन्नाकाका लुणावत, विनायकराव घाडगे आदी मंडळी बापूंना साथ देऊ लागली. आणि यातूनच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीला वेग आला. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बापूंच्या या प्रयत्नांना अंतिम स्वरुप दिले. 23 वर्षे अनवानी पायांनी राहत कारखाना उभारणीचे बापुंचे स्वप्न आता सत्यात परावर्तित झाले. त्रिवेणी या मनिनरी निर्माण कंपनीला आदिनाथच्या यंत्र निर्मितीचे काम दिले गेले आणि बघता बघता शेलगाव भाळवणीच्या या उजाड माळरानावर सहकाराचे एक मंदिर उभारले गेले. उजनीचा प्रकल्प कधीच पूर्ण झाला होता. उसासारखे नगदी पिक आता करमाळा तालुक्‍यातही शेतकरी घेऊ लागला. उजनीकाठचा आमचा शेतकरी आता बागायतदार झाला. शेकडो गरीब मुलांच्या हाताला आदिनाथ कारखान्याच्या रुपाने रोजगार उपलब्ध करुन देण्याचा बापुंचा मानसही पूर्ण झाला. आयुष्यात खुप काही गमावून बापुंनी आदिनाथची निर्मिती केली. एक इतिहास निर्माण केला. पण हे करत असताना जनतेकडून कर्मयोगी ही बिरुदावली बापूंना मिळाली. त्यांच्या जीवनप्रणालीस सत्य व त्याग हे गुणांचे अलंकार कायम जोडले गेले. आज बापू आपल्यात नाहीत. 
बापूंनी कारखाना उभारणी करताना आपला व परका असा भेदभाव केला नाही. शेतकऱ्यांना सभासदत्त्व देताना राजकारण केले नाही. त्यामुळे अगदी सहजभावनेने शेतकरी या कारखान्याचा मालक झालाय. आता त्याच्या हातात आहे की हा कारखाना परत सुस्थितीत आणायचा की मग भाडेतत्त्वावर चालवण्यास द्यायचा. परिस्थिती योग्य निर्णय घेईलंच. पण ज्या त्यागातून हा कारखाना उभारलाय त्या त्यागाची अपेक्षा शेतकऱ्यांच्या संचालक मंडळानेच हा कारखाना चालवावा व सुस्थितीत आणावा, अशी असणार आहे. 
गोविंद बापू पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या राजकीय वाटचालीस गोविंद बापू पाटील यांनी केलेल्या सामजिक कार्यक्षेत्रातील कार्यामुळे प्रेरणा मिळाली. 
 

  • जन्म 27 फेब्रुवारी 1931 
  • 1970 साली आदिनाथ सहाकारी साखर कारखान्याची स्थापना. 
  • 1993 साली काराखान्याचे गाळप सुरू 
  • भारत शिक्षण संस्था, जेउर ता. करमाळा या संस्थेची स्थापना. 
  • कुस्तीक्षेत्राची आवड. अनेकजणांना प्रोत्साहन 
  • निधन 20 जुलै 2020 

संपादन : अरविंद मोटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com