खैराट गावावर शोककळा ! ग्रामपंचायतीचे उमेदवार सायबण्णा बिराजदार यांचे निधन

राजशेखर चौधरी 
Friday, 15 January 2021

सायबण्णा बिराजदार यांची प्रकृती काल (गुरुवारी) रात्री अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. पण उपाचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज (शुक्रवारी) मतदाना दिवशीय पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खैराट येथील शेतकरी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार सायबण्णा धानप्पा बिराजदार यांचे निधन झाले आहे. 

याबाबतीत मिळालेली अधिक माहिती अशी, की खैराट येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीन येथे शेतकरी ग्रामविकास आघाडीकडून निवडणूक लढवीत असलेले सायबण्णा बिराजदार यांची प्रकृती काल (गुरुवारी) रात्री अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. पण उपाचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज (शुक्रवारी) मतदाना दिवशीय पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. 

काल दिवसभर ते आपल्या प्रचारात सक्रिय होते. आपल्या प्रभाग क्रमांक तीन येथील मतदारांच्या गाठीभेटी देखील त्यांनी घेतल्या होत्या. त्या वेळी त्यांची प्रकृती ठीकच होती, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. अचानक त्यांची प्रकृती रात्री बिघडली व त्यांचे निधन झाले. या अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप त्यांचा मृतदेह सोलापूर येथून गावी आणण्यात आला नव्हता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khairat Gram Panchayat candidate Saibanna Birajdar passed away this morning