बार्शी तालुक्‍यात 92 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी 

प्रशांत काळे
मंगळवार, 30 जून 2020

या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे बार्शी तालुक्‍यात 92 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी दिली. 

बार्शी (सोलापूर) : या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे बार्शी तालुक्‍यात 92 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी दिली. 
तालुक्‍यातील खरिपाच्या सरासरी 57 हजार 389 हेक्‍टरपैकी 52 हजार 588 हेक्‍टरवर (91.63 टक्के) पेरण्या झाल्या आहेत. अद्याप काही भागात पेरण्या सुरू आहेत. पेरणी झालेल्यामध्ये सोयाबीन, उडीद आणि तुरीचे क्षेत्र जास्त आहे. 
बार्शी तालुका हा रब्बीचा म्हणून ओळखला जात असला तरी काही वर्षांपूर्वी खरिपाची पेर वाढत आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन 35 हजार 469, तूर सात हजार 78, उडीद आठ हजार 841, मूग 848, मका 398 या प्रमुख पिकांचा समावेश आहे. सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे. मात्र, सोयाबीन उगवले नसल्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. तालुका पंचायत समितीमध्ये तक्रारींचा ढीग झाला असून सोयाबीन बियाणाचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बाजरी 21, भुईमुग 91, कापूस 37 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्‍यातील प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने नवीन ऊसलागवड नाही. फळपिकांच्या लागवडीत तालुक्‍यात वाढ होऊ लागली आहे. यामध्ये आंबा 12.80, द्राक्षे 108, लिंबू 24, सीताफळ 36 हेक्‍टर पिकांचा समावेश आहे. 

उडीद, सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा ओढा 
सोयाबीन व उडीद ही नगदी पिके म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरली आहेत. तसेच ही दोन्ही पिके घेतल्यानंतर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा किंवा गहू यासारखी पिके देखील घेता येतात. याबरोबरच या पिकांच्या उत्पन्नामुळे सण, उत्सव व रब्बीच्या पेरणीसाठी देखील शेतकऱ्यांच्या हातात भांडवल तयार होते. कुटुंबासाठी आर्थिक हातभार लागतो, अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kharif sowing on 92 percentage area in Barshi taluka due to rains