कडक लॉकडाउनमध्ये उडताहेत आकाशात पतंग, तर रस्त्यावर पळताहेत मुलांचे घोळके ! कसा होणार कोरोना हद्दपार? 

Lockdown Crowd
Lockdown Crowd

सोलापूर : शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने 16 ते 26 जुलै असा कडक लॉकडाउन सुरू केला आहे. शुक्रवारी (ता. 17) प्रत्यक्षात लॉकडाउनला सुरवात झाली, तेव्हा नागरिक स्वत:हून घरात लॉकइन होऊन प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे दिसून आले. मात्र लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवसापासून आज (मंगळवारी) पाचव्या दिवसापर्यंत रंगीबेरंगी पतंगांनी आकाश व्यापून जात असून, लहान मुलांचे घोळके कटलेल्या पतंगांचा मांजा व पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर पळत असताना दिसून येत आहेत. सोलापुरात वेगाने फैलावत असलेल्या कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने प्रशासनाने लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू केली; मात्र सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर पतंग उडवताना मुलांचे घोळके पाहता, कोरोना शहरातून कसा हद्दपार होणार, असा प्रश्‍न लॉकडाउन पाळत घरात बसलेल्या नागरिकांना पडला आहे. 

दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनमध्ये गर्दी टाळण्यासाठी किराणा, भाजीपाला विक्रीवर बंधने आली. त्यामुळे शहरात पूर्वीच्या मानाने या लॉकडाउनमध्ये गर्दी कमी दिसत आहे. मात्र शहरातील जुने विडी घरकुल, नीलमनगर, अशोक चौक, पोटफाडी चौक येथील राहुल गांधी झोपडपट्टी परिसर व त्यापुढील पद्मशाली चौक ते जमखंडी पूल आदी परिसरात दुपारी चार ते सायंकाळपर्यंत मुलांचे जत्थे पतंग पकडण्यासाठी धावत असताना दिसून येत आहेत. पोलिसांची वाहने, पोलिसही या परिसरातून फिरकत असून, ही मुले पाहूनही तसेच पुढे जात असतात. एखाद्या चौकात पोलिसांची कारवाई सुरू असते; मात्र नागरी वसाहतीत मुलांचे घोळके फिरत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका शहरवासीयांना वाटत आहे. 

कोरोनाचा संसर्ग वय, जात-पात पाहून होत नाही ! 
याबाबत श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गौरीशंकर कोंडा म्हणाले, विडी घरकुल ही गरीब कामगारांची वसाहत आहे. घराचा उंबरठा ओलांडल्यास थेट रस्त्यावरच यावे लागते. कोरोनाचा धोका पाहून कडक लॉकडाउनची अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली आहे, मात्र पूर्वीप्रमाणेच या लॉकडाउनचे नियम तोडून काही नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यात लहान मुले सायंकाळच्या सुमारास पतंग उडवत घोळक्‍याने फिरत आहेत. विडी घरकुल येथील पाण्याच्या टाकीवर चढूनही मुले पतंग उडवत असताना त्यांचे पालक व पोलिस प्रशासन गाफील असल्याचे दिसून येत आहे. लहान मुले आहेत म्हणून दुर्लक्ष केल्यास कोरोनाचे महाभयंकर वाढणार आहे. कारण कोरोनाचा संसर्ग वय व जात-पात पाहून होत नाही. 

ज्या परिसरात नियम तोडले जातील त्या परिसरात पुन्हा लॉकडाउन करावा 
येथील नागरिक संतोष चिप्पा म्हणाले, ज्या उद्देशाने लॉकडाउन जारी केला गेला तो उद्देश सफल होण्यासाठी कडक अंमलबजावणी अत्यावश्‍यक आहे. दुकाने, उद्योग-व्यवसाय बंद ठेवून व रोजगार बुडवून अनेकजण घरात बसलेले आहेत. मात्र आजही अनेकजण पोलिस नसल्याचे पाहून रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यात रोज सायंकाळी आकाशातील उडते पतंग पाहता व मुले घोळक्‍याने गल्लीबोळात पळताना पाहिले असता, कोरोनाची भीती मुलांना नसेल कदाचित निदान त्यांच्या पालकांनी तरी या मुलांवर अंकुश ठेवायला हवा. पोलिसांनीही मोठ्या चौकांमध्ये थांबून कारवाई करण्यापेक्षा गल्लीबोळातही फिरावे. ज्या परिसरात लॉकडाउन तोडण्याचे प्रकार घडतील फक्त त्या परिसरातच पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com