शिवरायांनी भेट दिलेला कृष्ण तलाव दुर्लक्षित ! पुरंदराच्या तहानंतर दिली होती मंगळवेढा किल्ल्याला भेट

Krishna Talav
Krishna Talav

मंगळवेढा (सोलापूर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडील मोहिमेसाठी मंगळवेढ्यापासून कोसभर अंतरावर असणाऱ्या कृष्ण तलावालगत शिवाजी महाराजांसह सैन्याचा पदस्पर्श लाभला. अजूनही हा परिसर दुर्लक्षित असून, या ठिकाणी शासनाने लक्ष दिल्यास एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. त्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे. 

कलचुरी राजवट व यादव काळापासून मंगळवेढ्यास ऐतिहासिक महत्त्व आहे. आदिलशाही साम्राज्याचे मंगळवेढा प्रवेशद्वार होते. इतिहासात अनेक वर्षांपासून मंगळवेढ्याचे एक वेगळे वैशिष्ट्य कायम राहिले आहे. परंतु सध्या हा मंगळवेढ्याचा इतिहास मात्र दुर्लक्षित झाला आहे. 

मिर्झाराजे जयसिंगांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह झाल्यानंतर फलटण - खटावमार्गे मंगळवेढ्याकडे येत असताना महाराजांनी नेताजी पालकरांना मंगळवेढा किल्ला ताब्यात घेण्यासाठी पुढे पाठवले. मागे असलेल्या शिवाजी महाराजांनी सोबतच्या घोडदळ व पायदळाबरोबर कोसभर अंतरावर असलेल्या कृष्ण तलावावर पाण्याची सोय व सुरक्षित ठिकाण असल्याने ते थांबल्याचे काही इतिहासकारांनी पुस्तकात नमूद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबर 1665 ला मंगळवेढा किल्ल्यात महाराजांनी प्रवेश केला. तलावाच्या परिसरामध्ये त्यांचे वास्तव्य झाल्याच्या काही खुणा असल्याचे इतिहासकार म्हणतात. 

दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवार मोहिमेत या तलावात कृष्णाचे मंदिर आढळून आले. जुन्या काळातील मूर्ती सापडल्या. त्यामुळे तलाव परिसर हा ऐतिहासिक परंपरा लाभलेला दिसून आल्यानंतर त्याचे उत्खनन थांबले. सापडलेल्या मूर्ती काही संशोधकांनी इतरत्र नेल्या तर काही पालिकेत ठेवल्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये याकडे दुर्लक्ष झाल्याने या ऐतिहासिक वारशाबद्दलची माहिती होणे आवश्‍यक आहे. 

तलावामधील गाळ काढल्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा परिणाम शहरालगत असलेल्या विंधन विहिरींना भरपूर पाणी लागले. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये नागरिकांच्या व दामाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेवाच्या विद्यार्थांच्या माध्यमातून 103 विविध प्रकारची 4700 वृक्षांची लागवड केली. ऐतिहासिक माहिती देणारे फलक या ठिकाणी लावून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

इतिहास काळापासून मंगळवेढ्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. शहरातील किल्ला व ऐतिहासिक मूर्तींचे जतन करण्यासाठी शासनाने नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बृहद आराखडा तयार करावा व वस्तू संग्रहालय करावे. पुढच्या पिढीला याबाबतची माहिती देण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नागरिकांचा पुढाकार देखील महत्त्वाचा आहे. पर्यटकांसाठी राहण्याची व निवासाची सोय झाल्यास पर्यटकांचा ओढा वाढू शकेल 
- डॉ. माया पाटील, 
पुरातत्त्व संशोधक, सोलापूर विद्यापीठ 

या परिसरामधील झाडांची नागरिकांकडून तोड होत होती. तलावातील गाळ काढल्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून या परिसरामध्ये वृक्षलागवड करण्यात आली. त्यामुळे परिसरामध्ये विविध वृक्षसंपदेमुळे परिसराचे सौंदर्य वाढले. परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था व पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी शासनाने लक्ष देऊन निधी दिल्यास या परिसराचा विकास होणार आहे. 
- राहुल शहा, 
अध्यक्ष, कृष्ण तलाव संवर्धन समिती 

कृष्ण तलावाचा परिसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्यामुळे नगरपालिकेला या भागात निधी खर्चासाठी मर्यादा येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेने तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रमाणे पर्यटन विकास आराखडा तयार करावा. तलावापर्यंत रस्ता व संरक्षक भिंत, तसेच विशेष निधीची तरतूद केल्यास या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील व मंगळवेढ्याचा ऐतिहासिक वारसा इतरांना माहिती होऊ शकेल. 
- सुहास पवार, 
उपसरपंच, चोखामेळा नगर 

स्व. भारत भालके यांनी आघाडी सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला. आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्‍यात पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पालकमंत्री, पर्यटनमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे निधी मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहे. 
- भगीरथ भालके, 
अध्यक्ष, विठ्ठल सहकारी साखर कारखाना 

मंगळवेढा हे दोन राजधान्या असणारे प्राचीन शहर असून, मंगळवेढ्यात खूप प्राचीन कलाकृती आहेत. कृष्ण तलावातील कृष्ण मंदिर अप्रतिम असावे. उत्खनन करणे गरजेचे आहे. जगातील तीन ब्रह्मदेवांच्या मूर्तींपैकी एक मंगळवेढ्यात आहे. मंगळवेढ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा सर्वांगाने विकास केल्यास महाराष्ट्रातील एक आगळेवेगळे पर्यटनस्थळ होईल. 
- ऍड. नंदकुमार पवार, 
मंगळवेढा 

शहरालगतचे कृष्ण तळे हे मंगळवेढ्याच्या प्राचीन इतिहासातीत एक पर्यटन स्थळ आहे. पशू, पक्षी व फुलपाखरांनी भरलेल्या या स्थळाचे जतन करण्यासाठी शासनाने लक्ष देऊन राष्ट्रीय पर्यटन स्थळ करण्याचा प्रयत्न करावा. मंगळवेढ्याची शोभा वाढविणारे एक ऐतिहासिक उत्कृष्ट स्थळ कृष्ण तळे आहे. त्याचा विकास होण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषदेचा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. 
- मोहन जुंदळे, 
ज्येष्ठ नागरिक संघटना, संत चोखामेळा नगर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com