बुलडाणा समितीला नाही पुनर्निर्णयाचा अधिकार ! आमदार माने यांचे भाऊ, मुलाच्या जात प्रमाणपत्राबाबत क्षीरसागरांची तक्रार निकाली 

प्रमोद बोडके 
Monday, 18 January 2021

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे चिरंजीव तेजस माने व बंधू सोपान माने यांच्या जात प्रमाणपत्र विरोधात शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी दाखल केलेली तक्रार बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाली काढली आहे. 

सोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे चिरंजीव तेजस माने व बंधू सोपान माने यांच्या जात प्रमाणपत्र विरोधात शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी दाखल केलेली तक्रार बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाली काढली आहे. उच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार समितीला पुनर्निर्णयाचे अधिकार नसल्याने ही तक्रार निकाली काढल्याचे समितीने म्हटले आहे. 

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (भटक्‍या जमाती), इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 या कलमानुसार समितीला पुनर्निर्णयाचे अधिकार प्राप्त नाहीत. तसेच उच्च न्यायालयाच्या देवेंद्र खेडगीकर विरुद्ध अनुसूचित जमाती समिती पुणे व इतर, संगीता शरद कोळसे विरुद्ध महाराष्ट्र शासन, संदीप मोहनराव वायचळ व सर्वोच्च न्यायालयाच्या आयुबखान नूरखान पठाण विरुद्ध महाराष्ट्र शासन या निवाड्याचा दाखला देत बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने क्षीरसागर यांच्या या दोन्ही तक्रारी निकाली काढल्या आहेत. समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी जी. आर. खरात, समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत, समितीचे सदस्य राकेश पाटील यांनी याबाबतचा आदेश 11 जानेवारीला दिला आहे. सोमेश क्षीरसागर यांनी यापूर्वी आमदार यशवंत माने यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर देखील समितीने पुनर्निर्णयाचा मुद्दा उपस्थित करत क्षीरसागर यांची तक्रार निकाली काढली आहे. 

आमदार यशवंत माने व त्यांच्या परिवाराकडे असलेल्या व्हीजेएनटी व अनुसूचित जाती या दोन्ही जातींच्या वैधता प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्यांनी विविध लाभ घेतले आहेत. समितीने आम्हाला अधिकार नाहीत एवढेच सांगितले आहे. आमदार माने यांच्याकडे आणि परिवारातील सदस्यांकडे असलेले प्रमाणपत्र बोगस की खरे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. त्यासाठी आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. आमदार माने एससी की व्हीजेएनटी, याचा सोक्षमोक्ष त्याच वेळी होईल. 
- सोमेश क्षीरसागर, 
तक्रारकर्ते 

आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. कायद्याच्या पुढे कुणी मोठा नाही. जातीच्या दाखल्यासंदर्भात वैध असल्याचा तिसऱ्यांदा दिलेल्या निकालामुळे इंदापूर तालुक्‍यातील छुप्या रुस्तुमांना व विरोधकांना, मोहोळ तालुक्‍यातील राजकीय विरोधकांना तिसऱ्यांदा मोठी चपराक बसली आहे. 
- यशवंत माने, 
आमदार, मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kshirsagars complaint against MLA Mane's brother and son's caste certificate was settled