निवडणूक मुंबईची, सोलापूरला अपेक्षा लक्ष्मीदर्शनाची

प्रमोद बोडके
Monday, 24 February 2020

सोलापूरच्या चौघांची माघार 
या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये करमाळ्याचे माजी आमदार तथा करमाळा बाजार समितीचे जयवंतराव जगताप, मंगळवेढा बाजार समितीचे सोमनाथ आवताडे, कुर्डुवाडी बाजार समितीचे सुहास पाटील आणि सोलापूर बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राज्याच्या राजकीय जुळवा जुळवीमध्ये जिल्ह्यातील नेत्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ आली. या निवडणुकीत जिल्ह्यातील उमेदवार नसल्याने मतदार आणि निष्ठेपेक्षा "माये'ला प्राधान्य देण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर : एकेकाळी निष्ठेवर चालणारे राजकारण आता लक्ष्मी दर्शनाशिवाय होत नाही. विधानपरिषद निवडणूक, जिल्हा परिषद, बाजार समिती सभापती निवडणूक यामध्ये पदापेक्षा हात धुवून घेण्याची संधीच अधिक असते. गेल्या काही निवडणुकांमुळे जिल्ह्यात याच संधीची चर्चा झाली. मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी सध्या निवडणूक सुरू असून महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर जिल्ह्यात आले आणि मतदान करा म्हणून सांगून गेले. मतदान करायला सांगितले, पण आमचे काय? या प्रश्‍नाचे उत्तर उमेदवारांनी न दिल्याने ही निवडणूक कोरडीच जाण्याची भीती मतदारांना लागली आहे. 
हेही वाचा - वंचितच्या रेखा ठाकूर म्हणाल्या...सुधारित नागरिकत्व कायद्या विरोधात करावा ठराव 
मुंबई बाजार समितीसाठी पुणे महसूल विभागातून पाच उमेदवार रिंगणात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील संचालक या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीतून कपबशीच्या चिन्हावर कोरेगावचे (जि. सातारा) बाळासाहेब सोळस्कर (पाटील) व भोरचे (जि. पुणे) धनंजय वाडकर नशीब अजमावत आहेत. या उमेदवारांनी सोलापूरसह जिल्ह्याच्या बाजार समित्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मतदान करण्याचे आवाहन केले. उमेदवार आले अन्‌ भेटून गेले, आमचे काय ठरले? याची प्रचंड उत्सुकता जिल्ह्यातील बाजार समितीच्या संचालकांना लागली असून ऐकामेकांकडे याबाबत गुपचूप चाचपणी केली जात आहे. 
हेही वाचा - प्रणिती शिंदे अज्ञानी...वंचितच्या रेखा ठाकूर यांची टीका 
या दोन मुख्य मतदारांशिवाय छत्री चिन्हावर चंद्रसेन काटकर, अंगठी चिन्हावर प्रदीपकुमार खोपडे आणि किटली चिन्हावर महादेव यादव नशीब अजमावत आहेत. जिल्ह्यात प्रचारासाठी फक्त महाविकास आघाडीचेच उमेदवार आले. अपक्ष उमेदवार प्रचारासाठी न फिरकल्याने निवडणुकीत अद्यापही म्हणावी तशी चुरस निर्माण झालेली नाही. शनिवारी (ता. 29) सोलापूरच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakshmidarshan expects Mumbai elections