रक्ताशी संबंधित "या' आजारांच्या रुग्णांची होतेय ससेहोलपट; शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध नाहीत औषधे 

Thalassemia
Thalassemia

सोलापूर : रक्ताचे आजार जे की थॅलेसिमिया, सिकलसेल ऍनिमिया, अप्लॅस्टिक ऍनिमिया, ल्युकेमिया व हिमोफिलिया ज्यामध्ये नवजात बालकांसह 14 वर्षे वयाच्या आजारी मुलांना उपचार व रक्त पुरवठ्याचे सातत्य हवे असते. मात्र शासकीय रुग्णालयामध्ये औषधे उपलब्ध नसणे व रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा यामुळे रुग्णांच्या पालकांसमोर अडचणी उभ्या राहिल्या असून, रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. 

रक्ताच्या आजारासाठी आवश्‍यक असलेले हिमॅटोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने केवळ रक्ताच्या कर्करोगाचे तज्ज्ञ असलेले डॉ. फहिम गोलीवाले हे ल्युकेमियावर उपचार करतात. मात्र उपचारासाठी लागणारी औषधे शासकीय रुग्णालयात मिळत नाहीत. थॅलेसिमिया या आजारासाठी महिन्यातून तीन वेळा रुग्णांना रक्त द्यावे लागते. सतत रक्त देण्यामुळे शरीरातील लोह घटक वाढल्याने डेक्‍स्ट्रॉल इंजेक्‍शन, केल्फर टॅब्लेट्‌स, डेसिरॉक्‍स टॅब्लेट नियमित घ्याव्या लागतात. डेसिरॉक्‍सच्या 30 गोळ्यांसाठी पंधराशे रुपये मोजावे लागतात. इतर जिल्हा रुग्णालयात ही औषधे रुग्णांना मोफत उपलब्ध होतात. पण सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये ही औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना ही औषधे विकत घ्यावी लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

थॅलेसिमियाच्या उपचारात विलंब झाला तर रुग्णांचे आयुष्यमान कमी होऊ शकते. त्यामुळे पालक उपचारासाठीच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करतात. शासकीय रुग्णालयामध्ये या उपचार व औषधी सेवा उपलब्ध करून दिल्यास पालकांना होणारा अनावश्‍यक खर्च देखील वाचू शकतो. थॅलिसिमिया रुग्णांसाठी शहरात हेडगेवार रक्तपेढी, दमाणी रक्तपेढी, अत्तार रक्तपेढी मोफत रक्त पुरवते. या रुग्णांना सतत रक्त द्यावे लागत असल्याने रक्तपेढ्यांकडून रक्तदात्यांची मागणी केली जाते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक रक्तदाते शोधून त्रस्त होतात. याबाबत शहरातील रक्तपेढ्यांनी या रुग्णांच्या मदतीसाठी एकत्रित निर्णय घेऊन नियमित रक्तपुरवठा करणे गरजेचे आहे. 

हिमोफिलियामध्ये रक्त गोठवणारा घटक (फॅक्‍टर आठ) शरीरात कमी असल्याने जखम झाल्यास रक्त शरीरातून न गोठता वाहून जाते. त्यासाठी दर महिन्याला फॅक्‍टर आठ हा रक्त घटक पुरवावा लागतो. हा रक्त घटक घेण्यासाठी पालकांना पुणे येथे जावे लागते. पुणे येथे हा घटक रुग्णास दिल्यानंतर एक ज्यादा बॅग घरी साठवून ठेवावी लागते. मुले खेळताना जखमी झाली तर हा घटक तातडीने रक्तात द्यावा लागतो. सोलापूर शहरात कोणत्याही रक्तपेढीत हा घटक उपलब्ध होत नाही. सोलापूर जिल्ह्यासोबत कर्नाटकाच्या सीमेवरून येणाऱ्या रुग्णांना देखील ही सेवा आवश्‍यक आहे. 

थॅलेसिमिया रुग्णांसाठी महिन्यातून तीनवेळा रक्तपुरवठ्याची गरज 

  • डेक्‍स्ट्रॉल इंजेक्‍शन, केल्फर व डेसीफॉस टॅब्लेटचा उपचार 
  • हिमोफिलिया आजारासाठी रक्त गोठवणारा फॅक्‍टर आठ घटकांचा पुरवठा 
  • कर्नाटकच्या सीमेवरील रुग्णांची संख्या जास्त 
  • फॅक्‍टर आठचा साठा नाही सोलापूरमधील एकाही रक्तपेढीत 
  • कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे जाऊन फॅक्‍टर आठ मिळवावे लागते 
  • तीन रक्तपेढ्यांकडून थॅलेसिमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठा 
  • रुग्णास सतत रक्त दिल्याने शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढते. त्यासाठी हृदय, यकृतवर दर तीन महिन्याला सोनोग्राफी व दरवर्षी केटूस्टार सोनोग्राफी आवश्‍यक 
  • गर्भवती मातांच्या तपासणीमध्ये बाळाचे थॅलेसिमिया निदान होऊ शकते 

आजाराची लक्षणे 

  • थॅलेसिमिया ः शरीरात लाल रक्तपेशी सतत कमी होणे 
  • हिमोफिलिया : रक्त गोठवणारा घटक रक्तात नसणे 
  • ल्युकेमिया : रक्तपेशींची अनियंत्रित वाढ 

थॅलेसिमिया रुग्णाचे पालक सचिन गुळद म्हणाले, सोलापूरमध्ये उपचारासाठी हिमॅटोलॉजिस्ट उपलब्ध नाहीत. तसेच केअर सेंटर नसल्याने थॅलेसीमिया आजारासाठी कोणतेही उपचार मिळत नाहीत. बाहेरगावी जाऊन खर्च करावा लागतो. पालकांच्या सहनशक्ती पलीकडे जाणारा हा खर्च आहे.

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com