विमा क्षेत्रात उलथापालथीनंतर उलाढालीत मोठी वाढ

प्रकाश सनपूरकर
Friday, 22 January 2021

मागील काही महिन्यात शहरातील विमा व्यवसायाने अनेक वेगवान बदल अनुभवले. कोरोना लॉकडाउनच्या काळात विमा ग्राहकांच्या आर्थिक अडचणीचा ताण वाढला होता. त्यासोबत अचानक नव्याने विमा संरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. ग्राहकांनी विमा ही गुंतवणुक न समजता सुरक्षा कवच म्हणून स्विकारले. मध्यमवयीन ग्राहकांनी विमा पॉलिसी घेण्यासाठी धावपळ केली

सोलापूर ः विमा व्यवसायामध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात उलथापालथी झाल्यानंतर अचानक ग्राहकांची मागणी वाढल्याने विमा व्यवसायात 40 टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली आहे. पहिल्यांदाच विमा गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. 

हेही वाचाः त्या बनावट दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ! भोसेकरांमध्ये तो कोण ची उत्सुकता 

मागील काही महिन्यात शहरातील विमा व्यवसायाने अनेक वेगवान बदल अनुभवले. कोरोना लॉकडाउनच्या काळात विमा ग्राहकांच्या आर्थिक अडचणीचा ताण वाढला होता. त्यासोबत अचानक नव्याने विमा संरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. ग्राहकांनी विमा ही गुंतवणुक न समजता सुरक्षा कवच म्हणून स्विकारले. मध्यमवयीन ग्राहकांनी विमा पॉलिसी घेण्यासाठी धावपळ केली. विमा संरक्षण करत असताना हयातीनंतर थेट फायदे कुटुंबियांना कसे मिळतील या बाबत पॉलिसीची निवड झाली. तसेच आरोग्य विम्याचा व्यवसाय देखील चांगलाच वाढता राहिला. आरोग्य विम्याची वाढ अनेक पटीची होती. काही कंपन्यांनी कोरोना रक्षक पॉलिसी देखील कोरोना काळात काढून लोकांना विमा संरक्षण उपलब्ध करन दिले. लॉकडाउनमुळे विस्कळित झालेले अर्थकारणानंतर देखील अचानक विमा व्यवसायाने मोठी झेप घेतली. 

ग्राहकांच्या बदललेल्या अपेक्षा 
- गुंतवणुकीच्या एैवजी जिवीत विमा संरक्षण 
- विमा घेण्यापूर्वी क्‍लेम सेटलमेंट रेशोला महत्व 
- आरोग्य विमा पॉलिसींची वाढती मागणी 
- टर्म इन्श्‍युरन्सला मागणी 
- टर्म इन्श्‍युरन्समध्ये रिफंडच्या पर्यायाचा शोध 
- कुटुंबातील सर्व सदस्यांना विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न 
- पेन्शन प्लॅन व जिवित संरक्षणाचा पर्यायाची चाचपणी 

ठळक बाबी 
- 45 ते 55 वयोगटातील ग्राहकांची संख्या वाढली 
- कधीही विमा न घेणाऱ्या ग्राहकांची वाढती संख्या 
- कोरोनामुळे आरोग्य विम्याबद्दल जागरुकता 
- विमा व्यवसायात मोठी वाढ 
- विमा व्यवसायाची उद्दीष्टे मार्चपूर्वीच पूर्ण 
- पहिल्यांदा विमा गुंतवणूक करणाऱ्या नव्या ग्राहकांची संख्येत अनेक पटीने वाढ 
- विमा ही एैच्छिक नव्हे तर अत्यावश्‍यक गरज म्हणून विकसित 
- डिजीटल पाठोपाठ विमा क्षेत्रात मोठी वाढ 

पुणे विभागात सर्वाधिक कामगिरी 
सर्वाधिक लोकांना विमा संरक्षण देण्यामध्ये पुणे विभागात सोलापूर जिल्हयाने सर्वात मोठी कामगिरी केली आहे. विम्याबद्दल वाढलेली जागरुकतेने विमा क्षेत्रात मोठा बदल घडला आहे. 
- अरुण  मिरगे, शाखाधिकारी, एलआयसी, सोलापूूर 

लोकांची जागरुकता वाढली 
अनेक प्रकारच्या विमा प्लॅनची लोकांकडून मागणी वाढली आहे. त्यानुसार आम्ही विमा योजना उपलब्ध करून दिल्या. लोकांना त्यांचे जीवन विम्याने संरक्षित असावे ही भूमिका अधिक ठळकपणे दिसून येत आहे. 
- प्रसाद कस्तुरे, शाखाधिकारी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, सोलापूर  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large increase in turnover after upheaval in insurance sector