राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी ‘यांची’ निवड

हुकूम मुलाणी 
Monday, 22 June 2020

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राज्याध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी दिले आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राज्याध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी दिले आहे.
तालुक्यातील मरवडेच्या सरपंच पदापासून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ग्राम शाखाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्षसह, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष आदी पदावर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. याशिवाय सरपंच, पंचायत समिती स्तरावर जनतेच्या विकासाची कामे त्यांनी केली आहेत. राष्ट्रवादीचे तत्कालीन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रभावी वक्ता म्हणून उदयास ते आले. पाच वर्षात विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीची ध्येयधोरणे ग्रामीण भागातील जनतेला व शरद पवार यांचे विचार अल्पसंख्यांक समाजामध्ये पोहोचण्यासाठी व तत्कालीन भाजप- शिवसेना सरकारच्या निष्क्रिय कामगिरीचा कामगिरीबाबत जनतेचे प्रबोधन व्हावे म्हणून राष्ट्रवादीच्या संघर्ष महाराष्ट्राच्या सात विभागातून काढलेल्या संघर्ष यात्रेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सोबतीने संघर्ष यात्रेत सहभाग नोंदवला. या यात्रेत त्यांनी पक्षाचे विचार व पक्षाची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांविषयी तळमळ लोकांसमोर भाषणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली. त्यांच्या निवडीनंतर दुष्काळी तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्त्याला राज्य स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.  त्यांच्या निवडीबद्दल आमदार भारत भालके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील डोके, भारत बेदरे, अशोक माने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latif Tamboli from Mangalwedha taluka elected as General Secretary of NCP OBC