विरोधी पक्षनेते फडणवीस यांची बार्शीला धावती भेट 

प्रशांत काळे 
Tuesday, 20 October 2020

बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी येथे सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान आमदार राजेंद्र राऊत यांच्या भोसले चौक येथील कार्यालयात धावती भेट देऊन अतिवृष्टीचा आढावा घेतला. या वेळी आमदार राऊत यांनी आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदन देऊन केली. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी येथे सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान आमदार राजेंद्र राऊत यांच्या भोसले चौक येथील कार्यालयात धावती भेट देऊन अतिवृष्टीचा आढावा घेतला. या वेळी आमदार राऊत यांनी आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदन देऊन केली. 

इंदापूर येथून उस्मानाबादकडे मार्गस्थ होत असताना फडणवीस बार्शीमध्ये अवघे दहा मिनिटे थांबले. या वेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उस्मानाबादचे राणा जगजितसिंह पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, सभापती रणवीर राऊत, भाजप शहर अध्यक्ष महावीर कदम व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

बार्शी शहर आणि तालुक्‍यात 14 ऑक्‍टोबर रोजी अतिवृष्टी, वादळी वारे, वीज पडून व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून, जीवित व वित्त हानी झाली आहे. घरांची पडझड झाली आहे. पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहून गेल्याने तसेच मृत झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शहरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

शेतातील माती वाहून गेली असून पिके, फळबागा यांचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे. नगरपरिषदेला तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार राऊत यांनी फडणवीस यांच्याकडे या वेळी केली. फडणवीस यांनी शासनाकडे पाठपुरावा करून आर्थिक मदत मिळवून देऊ, असे आश्वासन या वेळी दिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Opposition Devendra Fadnavis visited Barshi taluka