आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवायचाय? मग "या' गोष्टी करून मिळवा लाभ

तात्या लांडगे 
Saturday, 23 January 2021

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थींकडे रेशनकार्ड तथा अधिवास दाखला आणि मतदान, आधार अथवा पॅनकार्ड असणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना 31 जानेवारीपर्यंत या योजनेतून मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. त्याची मुदत आणखी वाढेल, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

सोलापूर : कोरोनामुळे देशभर लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर घरातील धान्य, पैसा संपलेल्या सर्वसामान्यांना आरोग्याची चिंता निर्माण झाली. मात्र, सर्वसामान्य लाभार्थींना केंद्र व राज्य सरकारच्या मोफत आरोग्य योजनांबद्दल काहीच माहिती नसल्याचे समोर आले. तीन ते पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार घेण्यासाठी राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना व केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा घेता येतो. योजनांबद्दल अधिक जाणून घ्या... 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थींकडे रेशनकार्ड तथा अधिवास दाखला आणि मतदान, आधार अथवा पॅनकार्ड असणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना 31 जानेवारीपर्यंत या योजनेतून मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. त्याची मुदत आणखी वाढेल, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. आयुष्यमान भारत योजना तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी निश्‍चित झाले आहेत. त्यांच्याकडे या योजनेचे ई- कार्ड अथवा केंद्र सरकारने टपाल कार्यालयातर्फे पाठवलेले लाभार्थींच्या नावाचे पत्र असल्यास, त्यांना योजनेतील रुग्णालयातून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. दरम्यान, कामगारांसाठीही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला असून त्यांना मात्र उपचारावरील खर्चाची कोणतीच मर्यादा घालण्यात आलेली नाही. या दोन्ही योजनांमधून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळण्यास मदत होत आहे. 

सर्वसामान्यांसाठी दोन्ही योजना वरदानच 
राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना व केंद्र सरकारची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ राज्यातील गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. आता कामगारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थींनी योजनेची माहिती जाणून घेऊन मोफत योजनांचा लाभ घ्यावा. 
- डॉ. बाहुबली नागावकर, 
सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य योजना, मुंबई 

आरोग्य योजनांचा "असा' घेता येईल लाभ... 

 • महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यभरातील 2.22 कोटी कुटुंबांचा आहे समावेश 
 • आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत मिळतात पाच लाखांपर्यंत मोफत उपचार 
 • आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील 83.67 लाख कुटुंबांना दिला जातोय मोफत उपचाराचा लाभ 
 • रेशन कार्ड आणि आधार कार्ड तथा पॅन कार्ड असल्यास सर्वच शिधापत्रिकाधारकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 996 आजारांवर मोफत उपचार 
 • आयुष्यमान तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थींची संख्या निश्‍चित; ई- कार्ड तथा केंद्राचे पत्र असलेल्यांनाच मिळेल योजनेचा लाभ 
 • रेशनकार्ड नवीन काढलेल्यांना अथवा नावे वाढलेल्यांनी रेशनकार्ड व आधार तथा पॅनकार्ड घेऊन योजनेतील रुग्णालयांमध्ये गेल्यास त्यांनाही मिळतात मोफत उपचार 
 • रेशनकार्ड नसलेल्या लाभार्थींकडे असायला हवे तहसीलदारांचे अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र 
   

  संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn the essential information about the benefits of Mahatma Phule Janaarogya Yojana