
प्रांताधिकायांची नियुक्ती
मोहोळ नगरपरिषद व माळशिरस व माढा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्याच्या तालुक्यातील प्रांत अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम राबविला जाणार आहे. नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांना सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीला मतदान करण्याची संधी मिळणार असल्याने अनेकांनी नगरसेवक होण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा जल्लोष सुरू असतानाच आता आणखी एका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मोहोळ नगरपरिषद, माढा आणि माळशिरस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मोहोळ, माढा व माळशिरसच्या नगरसेवकांसाठी 10 फेब्रुवारीला आरक्षण सोडत काढली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा आता प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.
मोहोळ, माढा, माळशिरसच्या प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (प्रभागांची संख्या, प्रभाग निहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षणासह) मुख्याधिकारी 1 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. 4 फेब्रुवारीपर्यंत या प्रारूप प्रस्तावाला जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. नगरसेवकांच्या आरक्षण सोडतीसाठी 8 फेब्रुवारीला नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. 10 फेब्रुवारीला नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत होणार आहे.
प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे, सदस्य पदाच्या आरक्षणावर 15 ते 22 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर 25 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. 5 मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडून प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीला मान्यता दिली जाणार आहे. मोहोळ, माढा आणि माळशिरसच्या या विद्यमान पदाधिकाऱ्यांची व नगरसेवकांची मुदत 8 मे रोजी पूर्ण होत आहे. मोहोळ, माढा आणि माळशिरससोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सातारा जिल्ह्यातील लोणंद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा बु. साठी ही प्रभागरचना व आरक्षण सोडत प्रक्रिया राबविली जाणार आहे.