एलईडी दिव्यांमुळे उजळून निघाला टेंभुणी-मंगळवेढा-उमदी महामार्ग !  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mangalwedha Highway

टेंभुर्णी - मंगळवेढा - उमदी या महामार्गावरील जवळपास तीन किलोमीटर रस्ता शहरातून गेल्यामुळे या रस्त्यावरील तीन किलोमीटर अंतरावर लावण्यात आलेल्या 220 एलएडी दिव्यांच्या उजेडामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. 

एलईडी दिव्यांमुळे उजळून निघाला टेंभुणी-मंगळवेढा-उमदी महामार्ग ! 

मंगळवेढा (सोलापूर) : टेंभुर्णी - मंगळवेढा - उमदी या महामार्गावरील जवळपास तीन किलोमीटर रस्ता शहरातून गेल्यामुळे या रस्त्यावरील तीन किलोमीटर अंतरावर लावण्यात आलेल्या 220 एलएडी दिव्यांच्या उजेडामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने संतांची शहरे भाविकांच्या सोयीसाठी चौपदरी रस्त्याने जोडण्याच्या उद्देशाने टेंभुर्णी - पंढरपूर - मंगळवेढा - उमदी या महामार्गाचे काम करण्यात आले आहे. यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतांचे गाव म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढ्याचे नाव महामार्गाच्या पटलावर आले. पंढरपूरला आलेल्या भाविकांचा ओढा आता नवीन रस्त्यामुळे मंगळवेढ्याकडे सहज वाढू शकेल अशी व्यवस्था रस्त्यामुळे झाली. तर याच रस्त्याच्या कामापैकी जवळपास तीन किलोमीटर अंतर रस्ता हा मंगळवेढा शहरातून गेल्यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. 

शहरातील रस्त्यावर बोराळे नाका ते पंढरपूर रोड बायपासपर्यंत जवळपास 220 एलईडी दिवे लावले आहेत. त्या दिव्यांच्या उजेडामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. परंतु याकडे पर्यटकांचा ओढा वाढवण्याच्या दृष्टीने पंढरपूर परिसरामध्ये मंगळवेढा शहरातील संत वास्तूंच्या माहितीचे फलक लावणे अपेक्षित आहे; तरच पंढरपूरला आलेला पर्यटक मंगळवेढ्यापर्यंत येऊ शकतो. 

मंगळवेढ्यातील 17 संतांच्या वास्तव्याबरोबर लगतच्या सिद्धापूर व माचणूर या पर्यटनस्थळी जाण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यातून तालुक्‍यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने शासनाच्या पर्यटन विभागाने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

तालुक्‍यात वाढलेले डाळिंबाचे क्षेत्र व प्रसिद्ध मालदांडी ज्वारी तसच चार कारखान्यांत तयार होणारी साखर देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी देखील या महामार्गाचा फायदा शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल