जाणून घ्या ऐतिहासिक स्थळ ब्रह्मपुरीबाबत ! राजे लखुजीराजे जाधवरावांचे पणतू यांचे समाधीस्थळ व मुघलकालीन राजधानी

Brahmapuri
Brahmapuri

ब्रह्मपुरी (सोलापूर) : सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरपासून 40 किलोमीटर व मंगळवेढापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी, माचणूर (ता. मंगळवेढा) येथील गावास पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. या गावातच मुघलकालीन सत्ता चालत होती. 

येथून वाहत असलेल्या नदी पात्रालगतच औरंगजेब बादशहाचा नदी पात्रातील कडेकपारीतील इ. स. 1695 च्या आसपासचा भुईकोट किल्ला आहे. येथूनच ते न्यायदान करत असत. भीमा नदीच्या पात्रात बाजूस सुंदर असे प्राचीन हेमाडपंती सिद्धेश्वराचे मंदिर आहे तसेच भीमा नदी पात्रातील कडेकपारीपासून जवळच ब्रह्मपुरी हे गाव असून, या गावास ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. मुघलांची सत्ता कित्येक वर्षे या गावापासून चालत होती. ब्रह्मपुरी परिसरातील गावात मुघलांच्या मोठ्या प्रमाणात छावण्या होत्या. औरंगजेब बादशहाने पाच ते सहा वर्षे या कालावधीत दिल्लीचा कारभार येथून चालवली होती. 

भीमा नदी पात्राजवळ असणाऱ्या स्थळावर श्रीमंत राजेलखुजीराव राजेजाधवराव यांचे पणतू श्रीमंत रावजगदेवराव राजेजाधव यांचे समाधीस्थळ आहे. तसेच माचणूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे अधिक महत्त्व आहे. आजूबाजूच्या परिसरात अधिक माहिती प्राप्त असून इतिहासकालीन स्थळं आहेत. माचणूर या गावाला नाथाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे प्राचीनकाली ऋषीमुनी तपश्‍चर्येला बसत असत. पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी नदी कडेच्या बाजूला भव्य असा घाट बांधला आहे. नदीपात्रात सुंदर असे भव्य देखणे जटाशंकर मंदिर आहे. या स्थळी शंकराचार्य, स्वामी समर्थ, सीताराम महाराज, बाबा महाराज आर्वीकर आदी संत येथे येऊन गेले आहेत. सिद्धेश्वर मंदिराच्या पूजेसाठी नगारा वाजवण्याचा मान माचणूर येथील मुस्लिम समाजाकडे आहे. पूजाअर्चा करण्याचा मान ब्रह्मपुरीतील गुरव समाजाकडे असून प्रत्येक बुधवारी आठवडा पाळीप्रमाणे आजतागायत बदलला जातो. 

माचणूर गडाच्या प्रवेशद्वारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशद्वारासमोर भिंत व दोन बुरूज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशद्वार तटबंदी व बुरूज अजून शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशद्वाराच्या विरुद्ध टोकाला मशीद आहे. मशिदीसमोर दगडात बांधलेला पाण्याचा टाक आहे. मशिदीच्या मागील बाजूस खोल व भीमा नदीच्या कडेकपारीत पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पुरामुळे नष्ट झालेली आहे. त्यामुळे पर्यटनास चांगली संधी उपलब्ध झाली असून, प्रशासनाने विकसित करून वारसा जतन केला पाहिजे. 

स्वराज्यस्वप्नदर्शक श्रीमंत महाराज लखुजीराजे जाधवराव हे राजमाता जिजाबाईंचे वडील आणि छत्रपती शिवरायांचे आजोबा एवढीच त्यांची ओळख आज जनसामान्यांना असली, तरी 
श्रीमंत राजेरावजगदेवराव दत्ताजीराव जाधवराव हे श्रीमंत राजेलखुजीराव विठ्ठोजीराव जाधवराव यांचे पणतू व देऊळगाव राजा प्रसिद्ध शाखा म्हणून गाजली. राजे रावजगदेवराव हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे तृतीय पुत्र बहादूरजी यांचे नातू होत. राजे बहादूरजी यांना पुत्र नव्हता म्हणून त्यांनी त्यांचे बंधू राजे राघोजी यांचे पुत्र राजे दत्ताजीराव यांना दत्तक घेतले होते. राजे दत्ताजीराव आणि माता सगुणाबाईसाहेब यांचे पुत्र रावजगदेवराव होत. पिता राजे दत्ताजीराव यांचा 10 नोव्हेंबर 1665 रोजी गुलबर्गा युद्धात मृत्यू झाल्यानंतर त्यांना वतन प्राप्ती झाली, तेव्हा त्यांचे वय अवघे 14 वर्षे होते. जाधवरावांचे वतन सर्व शाखांमध्ये एकत्रित होते; परंतु राजे दत्ताजीराव यांच्या मृत्यूनंतर सिंदखेडकर जाधवराव बंधूमंडल शाखांनी म्हणजे बंधूमंडलांनी वतनातून राजीनामे दिले म्हणून रावजगदेवरावास एकट्यासच वतनप्राप्ती झाली. 

कारकिर्दिच्या सुरवातीसच त्यांनी वाघीनगिरीचा किल्ला घेऊन आपला पराक्रम गाजवला. रावजगदेवरावांना सप्तहजारी मनसब व जहागिरी दिलेली होती. रावजगदेवराव हे स्थापत्य व कलाकौशल्याचे आवड असलेले होते. रावजगदेवराव हे खूप धार्मिक होते. त्यांची दिनचर्या ही शहाजी महाराजसाहेबांसारखीच दिसून येते. 

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिराचे बांधकाम हे राजे रावजगदेवराव यांनी इ. स. 1692 साली बांधून घेतले. आजही त्यांच्या वंशजांनाच फक्त मंदिराच्या गाभाऱ्यात विवाह लावण्याची परवानगी आहे आणि ती पिढ्यान्‌पिढ्या चालत आली आहे. राजे रावजगदेवराव यांचा मृत्यू 19 सप्टेंबर 1700 रोजी ब्रह्मपुरी येथील भीमा नदी काठाजवळच तळावर झाला. त्यांची समाधी ब्रह्मपुरी येथे आहे. 

ब्रह्मपुरी गावात औरंगजेबाची राजधानी होती. त्यावेळेस अनेक मराठा सरदार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील व्यक्ती येथे कैद होत्या. तसेच ब्रिटिशकालीन या गावात काही जणांना इनामी जमीन मिळाल्या. राजे जाधवराव यांचे भव्य स्मारक व्हावे. पर्यटनास संधी असून प्रशासनाने पाठपुरावा करावा. 
- आनंद पाटील, 
ब्रह्मपुरी 

ब्रह्मपुरी गाव हे भोसले-जाधवराव यांचे वंशज असून, मराठ्यांची काशी आहे. तेथील स्मारकास उजाळा दिल्यास गावं प्रसिद्धीच्या जोखात येतील. त्यामुळे पर्यटनास संधी मिळेल. 
- गोपाळराव देशमुख, 
इतिहास अभ्यासक, पंढरपूर 

ब्रह्मपुरी गावास ऐतिहासिक मोठे महत्त्व असून राजमाता जिजाऊमाता यांचे भाऊ बहादूरजीराजे यांचे नातू राजे जयजगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासनाने निधी देऊन प्रयत्न करावा. 
- राजन पाटील, 
संचालक, दामाजी शुगर 

ब्रह्मपुरी, माचणूर या गावात अनेक ऐतिहासिक स्थळे असून राजे जयजगदेवराव यांचे समाधीस्थळ, मुघलकालीन किल्ला, प्राचीन हेमाडपंथी श्री सिद्धेश्वराचे मंदिर आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्र म्हणून प्रशासनाने विकसित करून ऐतिहासिक वास्तू जतन केल्या पाहिजे. 
- जनार्दन शिवशरण, 
उद्योजक, माचणूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com